विकसित भारत संकल्प यात्रेला शहरातील १ लाख ६७ नागरिकांचा सहभाग
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. ९ : केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी पुणे शहरात २८ नोव्हेंबर २०२३ पासून सूरू असलेल्या ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेत आतापर्यंत १ लाख ६७ हजार ७२६ नागरिकांनी सहभाग घेतला. यात्रेच्या माध्यमातून शहरातील ६६ हजार १५७ नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे. यात्रेत ११ हजार ७८४ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणीचा लाभ घेतला. २४ हजार ३४६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ९ हजार ९८७ नागरिकांची आयुष्मान भारत कार्डसाठी नोंदणी करण्यात आली.
यात्रेदरम्यान १३ हजार २६० नागरिकांनी उज्वला गॅस योजना तर ६ हजार ७८० नागरिकांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेतला. ११ हजार ९७६ शिधापत्रिका नोंदणी, १३ हजार २५० नागरिकांनी आत्मनिर्भर भारतासाठी सामुहिक शपथ घेतली. विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात येत असून नागरिकांना योजनांची माहिती देणारी पुस्तिकाही देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तृतीयपंथी, विद्यार्थी आदी यात्रेत सहभागी होत आहेत. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
विकसित भारत संकल्प यात्रा पुणे शहरात २६ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. १० जानेवारी रोजी उंड्री चौक, फुरसुंगी गावठाण, ११ जानेवारी रोजी तुकाई टेकडी, एनआयबीएम चौक तर १२ जानेवारी रोजी वानवडी गावठाण, अमनोरा पार्क या भागात यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा