प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर - रे नगर येथील 15 हजार घरकुलांचे वितरण; प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गोरगरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क



            सोलापूर, दि. 19 : केंद्र शासन गोरगरिबांसाठी विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेतून रे नगर येथे तयार झालेला देशातील सर्वात मोठा गृहप्रकल्प होय. या गृहप्रकल्पामुळे येथील हजारो गोरगरिबांनी अनेक पिढ्यांपासून पाहिलेले घराचे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे, असे भावोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.


            दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निर्माण होत असलेल्या 30 हजार घरकुलांपैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरकुलांचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.


            यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, खा. रणजितसिंह निंबाळकर, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी तसेच रे नगर हाऊसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


            प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, जागतिकस्तरावर भारताचे महत्त्व वाढत असून त्यात छोट्या उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे. विकसित भारत होण्यास आत्मनिर्भर भारत बनणे गरजेचे आहे. त्यासाठी सूक्ष्म, लघु व कुटीर उद्योगांची भूमिका मोठी आहे. अशा उद्योगांना केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे. त्यातून मेड इन इंडिया उत्पादकांसाठी मोठ्या आशा वाढल्या आहेत. अशा प्रयत्नातूनच आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील अग्रक्रमांकाच्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.


            केंद्र शासनाने गरिबांना सर्वोच्च प्राधान्य देऊन विविध योजना राबवल्या. त्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना देऊन मध्यस्थांची साखळी बंद केली. गेल्या 10 वर्षात 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांच्या खात्यावर थेट पाठविले. जनधन योजना, आधार आदीद्वारे 10 कोटी बनावट लाभार्थ्यांना हटविण्याचे काम केले. याशिवाय गरिबांना साधन, संसाधने उपलब्ध करून दिल्यास ते गरिबीचा पराभव करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे लक्षात घेऊन मागील 9 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी राबविलेल्या अनेक योजनांमुळे 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आल्याचे ते म्हणाले.


            हे शासन गरिबांसाठी समर्पित होते असे 2014 मध्ये घोषित केले होते. त्यानुसार गरिबांच्या समस्या कमी होण्यासह त्यांचे जीवन सुलभ व्हावे म्हणून अनेक योजना राबविल्या. संपूर्ण देशात 4 कोटी लोकांना पक्की घरे 10 कोटी शौचालये, देऊन त्यांचा आत्मसन्मान वाढविण्याचे काम केले. देशातील गोरगरिबांना मोफत अन्नधान्य योजना कोरोना काळापासून लागू केलेली होती. त्या योजनेला पुढील पाच वर्षे मुदतवाढ दिलेली आहे. ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना राबवल्यामुळे देशभरात कोठेही गेल्यास संबंधित गरीब कुटुंबाला मोफत अन्नधान्य मिळण्याची सोय केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.


            आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्यावरील उपचारासाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, जन औषधी केंद्राद्वारे 80 टक्के पर्यंत सवलतीच्या दराने औषधे, हर घर जल योजना, शौचालय आदी सामाजिक न्यायाच्या योजना आहेत. संत रविदास, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले सामाजिक न्यायाचे स्वप्न याद्वारे पूर्ण केले जात आहे.


            सोलापूर शहर हे व्यापारी उद्योगांचे शहर असून येथील कापड व चादर उद्योग देशभरात प्रसिद्ध आहे. इथे कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचा लाभ येथील कामगारांनी घ्यावा असे आवाहनही प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी केले. संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, संत तुकाराम पालखी मार्ग तसेच विविध महामार्गाचे जाळे सोलापूर जिल्ह्यात निर्माण होत असून त्यातून विकासाची गती वाढणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्रावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणुकीस उत्सुक


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            दावोस येथे नुकत्याच झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यावर विश्वास असल्याने अनेक देश राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे या वर्षी 3 लाख 53 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परकीय गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली असून आणखी एक ते दीड कोटी रुपयांचे करार होणे अपेक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.


            राज्याच्या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मोठा हातभार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात अनेक पायाभूत विकासाचे प्रकल्प येत आहेत. दावोस येथे अनेक देशांचे राजकीय नेते, प्रशासक, उद्योजक व गुंतवणूकदार यांच्या भेटी झाल्या त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून श्री. मोदी हे संपूर्ण जगात भारताचे महत्त्व वाढवत असल्याचा अनुभव मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितला.


            सोलापूर हे देशातील सर्वात मोठे श्रमिकांचे शहर असल्याचे सांगून रे नगर येथील गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन पंधरा हजार नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळत असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद व्यक्त करून त्या सर्व कुटुंबांना शुभेच्छा दिल्या.


            प्रारंभी रे नगर फेडरेशन व गृह प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम यांनी प्रास्ताविक केले. या गृह प्रकल्पाविषयी तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या भूमिकेची माहिती त्यांनी दिली.


अमृत योजनेंतर्गत 1 हजार 201 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ


            केंद्र शासनाच्या अमृत.2 योजनेअंतर्गत भिवंडी-निजामपूर, सांगली, उल्हासनगर व कल्याण डोंबिवली या महापालिका तर शेगाव, सातारा व भद्रावती या नगरपालिका यांच्या मंजूर असलेल्या एकूण 1 हजार 201 कोटी एक हजार रुपयांच्या खर्चाच्या पाणी पुरवठा व  मलनिस्सारण व्यवस्थापन विकास कामांचे भूमिपूजन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले.


            रे नगर गृह प्रकल्प येथील तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेच्या तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक  स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज मंजुरीचे पत्रही यावेळी वितरित करण्यात आले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात