कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि.३: कन्यादान योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्याकरीता आयोजक स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कन्यादान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (नवबौद्धांसह), विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या पात्र जोडप्यांना २० हजार रुपये व सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रति पात्र जोडपे ४ हजार रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
सामूहिक विवाह सोहळे स्वयंसेवी संस्थांबरोबर केंद्र, राज्य शासकीय स्वायत्त संस्था, शासकीय तसेच सार्वजनिक प्राधिकरणे, जिल्हा परिषद आदींना आयोजित करता येतील. त्यांना स्वयंसेवी संस्थेप्रमाणे अटी लागू राहतील.
स्वयंसेवी संस्थेनी विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा- ०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा