विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



पुणे, दि. १८: विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि देशातील युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्याचे कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


'वाय4डी' फाउंडेशन मार्फत आयोजित इंडियाज मोमेंट कॉन्क्लेवमध्ये उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी 'वाय4डी' फाउंडेशन' चे अध्यक्ष प्रफुल्ल निकम, हिंदुस्तान कोको कोला बिवरेजेसचे उपाध्यक्ष हिमांशू प्रियदर्शनी, ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू पद्मश्री योगेश्वर दत्त, 'वाय4डी'चे सह सचिव अभिषेक तिवारी, बजाज फिन्सर्व्हचे अध्यक्ष कुरुश इराणी आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, देशातील युवा शक्ती अनेक मोठे बदल घेऊन येत आहे. स्टार्टअप्सध्ये ६० टक्के युवक लहान शहरातून येत आहेत. या स्टार्टअप्समुळे जनतेच्या जीवनातही बदल होत आहे. रोजगार मागण्याऐवजी रोजगार देण्यावर या युवकांचा भर आहे. देशातील सर्वात जास्त नोंदणीकृत स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स महाराष्ट्रात आहेत. या युवकांची प्रगती पाहता महाराष्ट्रला ट्रिलीअन डॉलर इकॉनॉमी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास वाटतो.


 कौशल्याला महत्व असलेल्या युगात आपण प्रवेश केला आहे. शिक्षणापेक्षा आज कौशल्याला अधिक महत्व देण्यात येत आहे. युवकांमध्ये चांगले काम करण्याची क्षमता आहे, श्रम करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांना कौशल्य मिळाल्यास त्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतील. त्यामुळे उपयोजित ज्ञानावर अधिक भर द्यावा लागेल. उद्योग आणि स्वयंसेवी संस्था यांनी युवाशक्तीला कौशल्याचे ज्ञान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगजगत कौशल्य विकासासाठी सहकार्यासाठी पुढे येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.


*शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कौशल्य पोहोचावा*

आपली अर्थव्यव्यवस्था कृषीप्रधान असताना ४० टक्के स्टार्टअप्स कृषी क्षेत्रातील आहेत. मात्र शेती क्षेत्रात कौशल्याची मर्यादा जाणवते. त्यामुळे या क्षेत्राला गती देण्यासाठी आधुनिकता आणून शेतकऱ्यालाही कौशल्य द्यावे लागेल. महाराष्ट्रात जागतिक बँकेच्या माध्यमातून सुमारे १० हजार गावात कृषी उद्योग संस्था तयार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा बाजार शेतकऱ्यांच्या हातात देण्याची व्यवस्था तयार करण्यात येत आहेत. उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांची यात महत्वाची भूमिका आहे. त्यांनी शासनाच्या योजनेसोबत अशा क्षेत्रात तंत्रज्ञानाची कमतरता भरून काढावी. यातून मोठे परिवर्तन शक्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.


मागील १० वर्षात देशाने महत्वाची प्रगती केली आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेची जगात चर्चा आहे. आर्थिक प्रगतीसाठी देशात अनेक निर्णय घेण्यात आले. प्रगतीला आवश्यक ‘वन नेशन वन टॅक्स’ सारखी व्यवस्था उभी राहिली आहे. डीजीटल व्यवस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभी करून डिजीटल व्यवहारात अमेरिका आणि चीनलाही आपण मागे टाकले आहे. २०३० पर्यंत जगातील तीसरी मोठी अर्थव्यवस्था आपण होणार आहोत, असेही ते म्हणाले.


भारत ही लोकशाही व्यवस्था, कायद्याचे राज्य आणि उद्योगाला अनुकूलता असल्याने अनेक उद्योग देशाकडे आकर्षित होत आहेत. एका बाजूला देशाची अशी प्रगती होत असतांना आपली जबाबदारी वाढली आहे. अशा अर्थव्यवस्थेलास अनुरूप कुशल मनुष्यबळ तयार करणे ही आपली जबाबदारी आहे. देशातील उद्योग या गोष्टीकडे लक्ष देत आहेत ही समाधानाची बाब आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.


उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, इच्छा असल्यास परिवर्तन करता येते हे आपल्या कार्यातून 'वाय4डी' फाउंडेशनने सिद्ध केले. २० राज्यात संस्थेचे कार्य सुरू असून ७ लाखापेक्षा अधिक लाभार्थी दिसून येत आहेत. विविध क्षेत्रात हे कार्य सुरू आहे. विशेषत्वाने उद्योगजगताच्या सहकार्याने निर्माण केलेले सकारात्मक वातावरण महत्वपूर्ण आहे, अशा शब्दात त्यांनी फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले.


प्रफुल्ल निकम यांनी फाउंडेशनच्या वाटचालीचा आढावा घेत कामाची, प्रकल्पांची माहिती दिली.  हिमांशू प्रियदर्शनी यांनीही मनोगत व्यक्त केले.


यावेळी फाउंडेशन आणि कोका कोला बिवरेजेस यांच्यात गावांच्या परिवर्तनाच्या कार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. तसेच फाउंडेशन आणि एलटीआयमाईंडट्री यांच्यात युवकांच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार करण्यात आला. फाउंडेशनच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले. 


सामाजिक विकासाच्या कामात घेतलेल्या पुढाकाराबद्दल कंपन्या आणि अशासकीय संस्थांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात