'७५ यशस्विनी बाईकर्स'चे शनिवार वाडा येथे स्वागत होणार

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. २०: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' या योजनेची प्रचार प्रसिद्धी करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या '७५ यशस्विनी बाईकर्स'चे २१ ऑक्टोबर रोजी शनिवार वाडा येथे सकाळी ९ वाजता आयोजित समारंभात स्वागत करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.


'यशस्विनी' मोटारसायकल फेरीचे कन्याकुमारी ते जम्मू काश्मिर या दरम्यान ५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.  या फेरीचा मुख्य उद्देश नारीशक्तीचे महत्व समजावून सांगणे, मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, मुलींचा जन्मदर वाढविण्यासोबत त्यांना सुरक्षित वातावरण व शिक्षण मिळणे याबाबत जनजागृती करणे आहे. फेरीमार्गावर येणाऱ्या विविध ठिकाणी किशोरवयीन मुली, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, अंगणवाडी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कॅडेटस आदीसोबत संवाद साधून 'महिला बाईकर्स' महिला सशक्तीकरणाविषयी संदेश देत आहेत.


राज्यात पुणे व मुंबई  येथून ही फेरी जाणार आहे.  त्यादृष्टीने जिल्ह्यात 'यशस्विनी' बाईक रॅलीचे १९ ऑक्टोबर इंदापुर तालुक्यात रोजी आगमन झाले असून वरकुटे बु. येथे स्वागत करण्यात आले. तसेच भिगवण, पाटस, भांडगाव, उरुळीकांचन आदी गावाच्या ठिकाणी या फेरीला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला आहे.


शनिवार वाडा येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, पोवाडा, मंगळागौर आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर महिला जवान उपस्थितांशी संवाद  साधणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे , असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात