जिल्ह्यातील पहिले 'मधाचे गांव' करण्यासाठी गुहिणी गावाची पाहणी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



पुणे, दि.१४:  जिल्ह्यातील पहिले 'मधाचे गांव' म्हणुन भोर तालुक्यातील गुहिणी या गावाची निवड होण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून येथील परिसराची पाहणी करुन भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.


महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या संकल्पनेनुसार राज्यात एकूण १० मधाची गावे करण्याचा मानस आहे. मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील मधाचे गांव संकल्पना राबविण्याकरीता भोर तालुक्यातील गुहिणी या गावाची निवड होण्यासाठी मधकेंद्र योजनेअंतर्गत जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.


महाबळेश्वर मधसंचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात, वेल्हे येथील तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या सामाजिक संस्थेचे  व्यवस्थापक रमेश आंबेकर, गावातील

 पदाधिकारी, ग्रामस्थ व मधपाळ उपस्थित होते.


महाबळेश्वर मधसंचालनालयाचे संचालक श्री. पाटील यांनी मधकेंद्र योजनेची व मधाचे गांव संकल्पना राबविण्याबाबतची माहिती दिली. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. खरात यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजना, मधकेंद्र योजना, मधाचे गांव याबाबत मार्गदर्शन केले. 


कार्यक्रमानंतर संचालक श्री. पाटील यांच्या हस्ते येथील जंगल परिसरामध्ये जांभुळ या वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले.


*गुहिणी गावाची माहिती*

गुहिणी गाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तोरणा, राजगड, मढेघाट परिसराच्या कुशीत वसलेले असून भाटघर धरणाच्या पाठीमागील बाजुस निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक छोटेसे गांव आहे. मधमाशा पालनास उपयुक्त जांभुळ, आंबा, कारवी, करवर, अर्जुन, कांदळवन व आखरा आदींचे वनस्पती फुलोरा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असुन गावातील सुमारे १५ मधपाळ पारंपारिक पद्धतीने आग्या, सातेरी, फुलोरी पिकळा मध गोळा करतात. विविध प्रकारच्या मधाच्या किंमती आठशे ते एक हजार रूपये किलोच्या दरम्यान आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात