डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत ;२० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर एक लक्ष प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


            पुणे, दि २८ : डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईतील महापे येथे स्थापित होणार असून यामुळे २० हजार कोटींची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार मिळेल. येथे स्थापित होणा-या उद्योगांना महाराष्ट्र शासनाने काही  सवलती व प्रोत्साहने  सुद्धा जाहीर केली आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना दिली.


            मंत्री  सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली  महाराष्ट्र आजही थेट परकीय गुंतवणुकीत देशात क्रमांक एकवर आहे.


            रत्ने व आभूषणे क्षेत्रातील केंद्र शासनाची शिखर संस्था म्हणजेच जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलद्वारे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नवी मुंबई येथे स्थापित करण्यात येत आहे. या पार्कमध्ये सुमारे २ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक स्थापित होणार आहेत. तसेच येथे मोठ्या नामांकित कंपन्या सुद्धा गुंतवणूक करतील. अशा प्रकारचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.


इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्ककरिता महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली प्रोत्साहने


            या पार्ककरिता १ मार्च २०१९ रोजी झालेल्या  उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत जेम्स अँड ज्वेलरी पार्ककरिता महाराष्ट्र शासनाने महापे येथे मोकळ्या भुखंडाचे औद्योगिक भुखंडात रुपांतर करून ८६ हजार ५३ चौरस मीटर एवढी जागा निश्चित करून दिली आहे. मात्र अशा उद्योगांसाठी केवळ जागा उपलब्ध करून होणार नाही तर या उद्योगांना काही प्रोत्साहन आणि सवलती देणे आवश्यक आहे, असा विचार करून उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीने या उद्योगांसाठी २८ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकित सवलती जाहीर केल्या आहेत.


            जेम्स अँड ज्वेलरी पार्क करिता मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला. या पार्ककरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे ३ चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) यापूर्वी दिलेला आहे. अतिरिक्त २ एफएसआय देण्याचा निर्णय घेतला. याअतिरिक्त २ एफएसआयपैकी १ एफएसआय लॅब ग्रोन डायमंडस् उद्योगासाठी वापरण्यात येईल. उर्वरीत १ अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक वापरुन विकसित केलेले क्षेत्र एमआयडीसीला विनामूल्य हस्तांतरीत करण्यात येईल.  सदर विकसित क्षेत्र जेम्स ॲण्ड ज्वेलरी तसेच लॅब ग्रोन डायमंड क्षेत्राशी निगडीत अन्य उद्योगांना देण्याकरीता राखीव ठेवण्यात येईल.


            स्थापित होणाऱ्या घटकांकरीता पहिल्या भाडेपट्टा करारावर मुद्रांक शुल्क सवलत असेल. पार्कमधील घटकांना ५० टक्के ढोबळ वस्तू व सेवा कराचा परतावा ५ वर्षेपर्यंत देण्यात येईल. लॅब ग्रोन डायमंडस् उद्योग हा नवीन सेक्टर राज्यात विकसित होण्याकरीता एक विशेष बाब म्हणून या घटकांसाठी २ रुपये प्रति युनिट दराने ५ वर्षांसाठी विद्युत दरात सवलत देण्यात येणार. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकांसाठी विद्युत शुल्क माफी ५ वर्षे दिली जाईल. सर्व प्रोत्साहने प्रति घटक पात्र गुंतवणूकीच्या १०० टक्के मर्यादेत देय करण्याचा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात