जिल्ह्यातील ३० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



पुणे, दि. १९: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील ३० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांसह राज्यातील ५११ केंद्रांचे आज दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले; या केंद्रामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराच्यादृष्टीने उपयुक्त कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळणार आहे.


जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत 

पुरंदर तालुक्यातील दिवे ग्रामपंचायत परिसरात  शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रांत राजपूत, गट विकास अधिकारी अमिता पवार, नागरिक, दिवे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. 


जिल्ह्यात इतर ठिकाणीही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास  केंद्र उदघाटन कार्यक्रमाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. 


महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार तयार होण्याच्यादृष्टीने युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत आहेत.  जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे सहायक सौंदर्य थेरपिस्ट, घोडेगाव येथे शिलाई मशीन ऑपरेटर, शिनोली येथे प्रक्रिया पर्यवेक्षक (रंगकाम व मुद्रणकला), बारामती तालुक्यात बाबुर्डी येथे मल्टिस्किल इलेक्ट्रिकल तंत्रज्ञ आणि गुणवडी येथे वेब डेव्हलपर, भोर तालुक्यात भोलावडे येथे सुरक्षा रक्षक व वेलु येथे गृहस्वच्छता-स्वयंपाकी या विषयांचे कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 


दौंड तालुक्यात यवत येथे पथ खाद्य विक्रेता, पाटस येथे सहायक वीजतंत्री आणि केडगाव येथे गृहस्वच्छता-स्वयंपाकी, हवेली तालुक्यात उरळीकांचन येथे मल्टिस्किल इलेक्ट्रिकल तंत्रज्ञ,  लोणीकाळभोर येथे गृहस्वच्छता-स्वयंपाकी आणि कदमवाकवस्ती येथे वीजतंत्री- घरगुती साधने, इंदापूर तालुक्यात कळंब वालचंदनगर येथे मल्टिस्किल इलेक्ट्रिकल तंत्रज्ञ  आणि  निमगाव केतकी येथे सुरक्षा रक्षकविषयक कौशल्य  विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


जुन्नर तालुक्यात नारायणगाव येथे वैद्यकीय अभिलेख सहायक, ओतुर येथे मोबाईल हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ आणि आळेफाटा येथे  अकाउंट्स एक्झिक्युटीव्ह,  खेड तालुक्यात नानेकरवाडी येथे सीएनसी ऑपरेटर- टर्निंग आणि मेदनकरवाडी येथे फिटर- फॅब्रिकेशन, मावळ तालुक्यात कुसगाव बु. येथे ग्राफिक डिझायनर आणि खडकळा येथे ॲनिमेटर, मुळशी तालुक्यात पिरंगुट येथे मल्टिस्किल टेक्निशयन आणि माण येथे फील्ड टेक्निशियन- संगणक व साधने या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


पुरंदर तालुक्यात दिवे येथे हँडस्केच आणि ज्वेलरी डिझायनर, वीर येथे मल्टिस्किल इलेक्ट्रिकल टेक्निशयन, शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे फिटर-फॅब्रिकेशन, तळेगाव ढमढेरे येथे  क्षेत्र तंत्रज्ञ आणि  घरगुती उपकरणे आणि सणसवाडी येथे सीसीटीव्ही तंत्रज्ञ तर वेल्हा तालुक्यातील मार्गासनी येथे वीज तंत्रज्ञ - घरगुती वीज उपाययोजना या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे


प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामुळे सक्षम व कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोच ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळण्यास मदत होणार असल्याने शासनाची ही योजना ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात