उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दापोडी-निगडी कॉरिडॉरचा आढावा ; दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्या-अजित पवार

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



पुणे, दि. १४:राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.


यावेळी आमदार अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव,  पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,  मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी-निगडी कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. ते म्हणाले, रस्त्याच्या बाजूला दोन झाडांच्यामध्ये अधिक जागा असल्यास तेथे वृक्षारोपण करावे, प्रामुख्याने स्थानिक प्रजातीची झाडे वापरावी. पदपथाच्या बाजूला असणारी हिरवळ आणि फुलझाडांचे नीट जतन होईल याचे सुरुवातीपासून नियोजन करावे.  


पदपथावर आलेले अतिक्रमण काढण्यात यावे. तसेच कामादरम्यान रस्त्याच्या बाजूला होणारे अतिक्रमण तात्काळ काढावे. पूल आणि मेट्रोमार्ग परिसरात सुशोभीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. कामांची देखभाल दुरुस्ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी उत्तम दर्जाची सामुग्री वापरावी, अशी सूचना त्यांनी केली. 


पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्विकास, शहरातील अतिक्रमण काढणे आदीविषयी देखील उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी माहिती घेतली. पवना धरण भरले असले तरी आतापासून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.


पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात औषधे, मनुष्यबळ, आरोग्य सुविधांमध्ये त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री.पवार यांनी दिले.


आयुक्त श्री.सिंह यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाविषयी माहिती दिली. दापोडी-निगडी कॉरिडॉर १२ किलोमीटर लांबीचा असून त्यात विविध प्रकारच्या सुविधांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात