उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना भेट ; विघ्नहर्त्याचा आशिर्वाद पुण्याला, महाराष्ट्राला लाभू दे- देवेंद्र फडणवीस यांचे साकडे

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



पुणे दि.21: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे आणि ते विघ्न दूर करण्याचे काम करतात. विघ्नहर्त्याचा आशिर्वाद निश्चितपणे पुण्याला, महाराष्ट्राला मिळेल असा विश्वास आहे, असे प्रतिपादन यावेळी श्री. फडणवीस यांनी केले.


गणेश मंडळांना भेटी व दर्शनाच्या प्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री कसबा गणपतीची आरती केली. तसेच भारुसाहेब रंगारी गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती, लक्ष्मी मार्ग येथील गुरुजी तालिम मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई येथील अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, तुळशी बाग येथील तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,  केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक  वाडा गणेशोत्सव मंडळ, सहकारनगर येथील सहजीवन मित्र मंडळ, अंबिल ओढा येथील साने गुरूजी मित्र मंडळ, कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले तसेच श्रीगणेशाची आरती केली. यावेळी त्यांचा मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, गणेशोत्सव आणि पुण्याचे अनोखे नाते असून सार्वजनिक गणेशोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात पुण्यातून लोकमान्य टिळकांनी केली. सामाजिक अभिसरणातून भेदभावविरहित एकसंघ समाज निर्माण व्हावा या हेतूने त्यांनी ही सुरुवात केली. या महोत्सवाला संपूर्ण भारतभर मोठे स्वरुप आले आहे. पुण्याने गणेशोत्सवाचे सांस्कृतिक रूप टिकविले आहे, असेही ते म्हणाले.


*पुणे पोलीसांच्या सारथी गणेश उत्सव गाईड सुविधेचे उद्घाटन*

पुणे पोलिसांच्या उत्सव गणेशाचा सारथी गाईड सुविधेच्या लिंकचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते अनावरण झाले. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त प्रदीपकुमार मगर उपस्थित होते. 


पुणे शहरातील गणेश मंडळांचे दर्शन व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अनेक भाविक चारचाकी व दुचाकी आणतात. त्यासाठी २८ पार्किंगची ठिकाणे निश्चित केली आहेत. या पार्किंगची माहिती सारथी गाईड क्यूआर कोड स्कॅन केल्यास तसेच लिंकवर क्लिक केल्यास मिळू शकणार आहे. याशिवाय १२ मानाच्या गणपती यांच्या दर्शनासाठी  वाहतूक मार्गाची माहिती व मार्गदर्शन मिळू शकणार आहे. बंद रस्ते, उपलब्ध मार्ग यांची माहिती मिळाल्यामुळे नागरिकांना सुविधा मिळण्यासह वाहतूक जलद होण्यात मदत होणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात