'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या अनुषंगाने ७ ऑगस्ट रोजी वाहतूकीत बदल
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. ५: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ७ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपासून ते रात्री. ९ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
*जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक:* सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.
*वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक:* बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.
*सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हवीतील वाहतूक:* पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण - सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा - फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.
वाहतुकीस लावलेले निर्बंध ७ ऑगस्ट रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा