‘माझी माती, माझा देश’ अभियानातून देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


मुंबई, दि. 9 : “देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


ऑगस्ट क्रांती मैदान येथे केंद्र शासनाच्या 'आझादी का अमृत महोत्सव' सांगतेच्या निमित्ताने 'मेरी माटी-मेरा देश' अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियानांतर्गत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या नावाच्या शिलाफलकाचे अनावरण आणि ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तूजतनाच्या विविध कामांचे लोकार्पण या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, आमदार मनीषा कायंदे, आमदार आशिष शेलार, आमदार यामिनी जाधव, आमदार सदा सरवणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,  मुंबई महानगरपालिका आयुक्त  इकबाल सिंह चहल आदी यावेळी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महात्मा गांधींनी  ब्रिटिशांना 'चले जाव'चा नारा येथूनच  दिला आणि तरुणांमध्ये चेतना जागविली. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दाखविली. अशा अगणित हुतात्म्यांच्या त्यागाने, बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप आपण ‘माझी माती माझा देश’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित अशा उपक्रमाने करत आहोत. प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या या मंत्राचा जागर आजच्या काळात आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


महाराष्ट्राला शिवछत्रपतींचा  वारसा आहे. त्यासोबत, संतांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारांची मोठी फळी या महाराष्ट्राने देशाला दिली. कष्टकरी,  शेतकरी, कामगार यांनी योगदान दिले. त्यामुळे केवळ त्यांच्या बलिदानाचे स्मरण करुन नव्हे तर त्यांची निष्ठा तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, याच उद्देशाने हे अभियान देशभरात राबविले जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना सांस्कृतिक कार्य विभागाने आगळेवेगळे कार्यक्रम आयोजित केले. देशात आपल्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली या विभागाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात राज्याला प्रथम क्रमांक मिळवून दिला. इंडिया@75 या उपक्रमात आपण तब्बल 10 लाख 64 हजार 410 कार्यक्रम घेतले, याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कौतुकोद्गार काढले.


ऑगस्ट क्रांती मैदानाच्या ऐतिहासिक आठवणी, घटना आहेत. ते जपण्याचे काम मुंबई महापालिकेने केले असल्याचे सांगून राज्यातही सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,  विविध यंत्रणा या सर्वांच्या समन्वयाने हे अभियान यशस्वी होईल असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.


*अभियानाच्या माध्यमातून गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचे काम- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*


उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, 9 ऑगस्ट हा स्वातंत्र्यसैनिकांना, शहिदांना नमन करण्याचा दिवस आहे. आपण या ठिकाणी शहिदांची आठवण करून, वृक्षारोपण करून, देशाचा तिरंगा फडकवून आणि आपल्या मातीला नमन करून सुरुवात केली आहे. येत्या काळामध्ये या पंचप्रणच्या माध्यमातून निश्चितपणे आपण नागरिक म्हणून देशाला विकसित करण्याचे स्वप्नं पूर्ण करु. या अभियानाच्या माध्यमातून गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचे काम सुरु झाल्याचे ते म्हणाले.


ऑगस्ट क्रांती मैदानाचे एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी उचित व्यवस्था असावी, नीटनेटकेपणा असावा, या ठिकाणी शहिदांची स्मृति असावी,  त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिकेने चांगली व्यवस्था केली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये सुशोभीकरणाची कामे सुरु आहेत,  मुंबई बदलत आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


*त्याग आणि बलिदानाची आठवण जपत विकासाची ज्योत तेवत ठेवा - उपमुख्यमंत्री अजित पवार*


उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे लोकआंदोलन ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरु झाले. या स्वातंत्र्यसैनिकांनी, त्यांच्या कुटुंबियांनी देशासाठी त्याग केला. ही देशभक्ती आणि विकासाची ज्योत तेवत राहील आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. देशाच्या प्रगतीत अनेकांचे योगदान आहे. 1947 पासून ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत विकासाची वाटचाल सुरु आहे. मुंबईत घडलेल्या विविध घटनांचा उल्लेख करुन श्री. पवार यांनी यावेळी मुंबईकरांच्या लढवय्या वृत्तीचे कौतुक केले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी ऑगस्ट क्रांतीस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या नावांची नोंद असलेल्या ‘शिलाफलका’चे अनावरण आणि 'वसुधा वंदन' अंतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले. तसेच, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन रॅलीला यावेळी मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवला. 

या मान्यवरांच्या उपस्थितीत ‘भारताला विकसित देश बनवायचे आहे. तसेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजूटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे’, ही पंचप्रण (शपथ) सर्व उपस्थितांनी यावेळी घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात