स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा ; देशातील सर्व नागरिकांच्या एकजुटीतून स्वातंत्र्य आणि लोकशाही भक्कम करुया --उपमुख्यमंत्री अजित पवार
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. 14 :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले असून स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. उत्कृष्ट कामगिरी, उल्लेखनीय सेवेबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक, सेवापदक जाहीर झालेल्या राज्यातील पोलिस, अग्निशमन, नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दलाच्या अधिकारी व जवानांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्ताने दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, देशाला मिळालेले स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या त्याग, बलिदानातून मिळाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखण्यासाठी गेल्या 76 वर्षात भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी बलिदान दिले. या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करुन देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी कटीबद्ध होण्याचा आज दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्योत्तर 76 वर्षांच्या वाटचालीत, देशाचा गौरव वाढवण्यात शेतकरी, कष्टकरी, डॉक्टर, वकिल, इंजिनियर, पत्रकार, व्यापारी, उद्योजक, संशोधक, खेळाडू, कलावंत मंडळी, विद्यार्थी, शिक्षक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते अशा सर्वांचं योगदान आहे. या समस्त देशवासियांची एकजूट, कष्टामुळं, मेहनतीमुळं देश आज अभिमानाने उभा आहे. प्रगती करत आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवून, सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी एकत्र येऊन देशाला जागतिक शक्ती बनवण्याचा दृढनिर्धार करुया. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाची लोकशाही मजबूत करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा