जिल्ह्यातील २० हजार गृहनिर्माण संस्थांमध्ये विशेष मतदार नोंदणी अभियान’-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



पुणे दि. १४- जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी येत्या २२ व २३ जुलै २०२३ रोजी  जिल्ह्यातील २० हजार ९३६ गृहनिर्माण  संस्थांमध्ये ‘गृहनिर्माण सोसायटी मतदार नोंदणी अभियान’  राबविण्यात येणार असून गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी या अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.


अभियानाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व मतदार नोंदणी अधिकारी , सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी   उपस्थित होते.


डॉ.देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करावे. अभियानाची माहिती सोसायटीतील सदस्यांपर्यंत पोहोचवावी. तेथील अपेक्षित मतदार संख्या, झालेली मतदार नोंदणी याबाबत माहिती घेऊन अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे. अभियानाशी संबंधीत घटकांना सहभागी करून घेतल्यास मतदार नोंदणीस  चांगला प्रतिसाद लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


छावणी क्षेत्रातील लष्कराच्या अधिकाऱ्यांशी अभियानाबाबत चर्चा करावी. हिंजवडीसारख्या भागातील मोठ्या गृहनिर्माण संस्थांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनांच्या प्रमुखांचे अभियानासाठी सहकार्य घेण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.


पुणे जिल्ह्यात  साधारणपणे २० हजार ९३६ इतक्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत. संस्थांमधील प्रत्येक पात्र व्यक्तीची नोंद मतदार यादीमध्ये व्हावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक कार्यालया तर्फे  हे अभियान राबविण्यात येत आहे.  अभियानांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व इतर कर्मचारी २२ व २३ जुलै  रोजी गृहनिर्माण संस्थांना भेट देऊन मतदार नोंदणी करणार आहेत.  जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी स्वत: गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना पत्र लिहून   यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रीयेची माहिती दिली आहे आणि त्यांना सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.


गृहनिर्माण संस्थांच्या चेअरमनची या अभियानात महत्वाची भूमिका आहे. त्यांनी सर्व सभासदांना अवगत करावे, ज्यांची मतदार नोंदणी झालेली नाही त्यांची पुराव्यांच्या कागदपत्रासह यादी करून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे सादर करावी. मयत व स्थलांतरीत मतदारांची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी आणि आपली सोसायटी १००  मतदार नोंदणी असलेली सोसायटी करावी. मतदार यादी शुद्धीकरण मोहीमेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनी डॉ.देशमुख यांनी पत्राद्वारे केले आहे.


जिल्ह्याची  अंतिम मतदार ५ जानेवारी रोजी  प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधी मध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून  नवमतदारांची नोंदणी वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांना वर्षातुन चार वेळा म्हणजेच १ जानेवारी १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी करता येणार आहे. 


मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत  रहिवास पुरावा म्हणून विद्युत देयक, पाणी पट्टी, आधार कार्ड, बँकेचे किंवा पोस्टाचे पास बुक, भारतीय पारपत्र, नोदणीकृत विक्रीखत, नोंदणीकृत भाडेकरार इत्यादी तर वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड, राज्यशिक्षण मंडळाने निर्गमित - केलेले १० वी किंवा १२ वी चे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. पात्र नागरिकांनी अभियानात सहभागी होवून मतदार नोंदणी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात