अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. ३०: सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत असून इच्छुक स्वयंसहायता गटांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी ३ लाख ५० हजार या मर्यादेत (९० टक्के शासकीय अनुदान व १० टक्के स्वयंसहायता बचत गटांचा हिस्सा) किमान ९ ते १८ अधशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या १० टक्के हिस्सा पूर्ण भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या ९० टक्के (कमाल ३ लाख १५ हजार रुपये) अनुदान देय राहील.
स्वयंसहायता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार इतकी असावी.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांतील लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या समोर, येरवडा, पुणे ४११००६ दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६१ या कार्यालयात ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा