जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न ; सर्व विभागांनी आपत्तीच्या परिस्थितीत समन्वयाने काम करावे-डॉ.राजेश देशमुख

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे दि. ४: नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जात त्यातून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदैव दक्ष रहावे; सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून मदतकार्य आणि माहितीचे आदानप्रदान गतीने करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एनडीआरएफचे कमांडंट संतोष बहादूर सिंग, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.


डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात ११ नद्या आणि ८० पेक्षा जास्त पूरप्रवण गावे, २२ दरडप्रवण गावे आहेत. याशिवाय पुणे, पिंपरी चिंचवडसह शहरांमध्ये जुने वाडे, जुन्या निवासी इमारती आहेत. यंदा अल निनोचा अंदाज असला तरी गतवर्षी पर्जन्यछायेतील तालुक्यात एका दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या बाबींचा विचार करुन आपत्तीच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. 


आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक असलेली जेसीबी, पोक्लेन आदी यंत्रसामुग्री गतीने उपलब्ध व्हावी यासाठी त्यांची यादी करुन परिवहन विभागाने सर्व संबंधित यंत्रणांना उपलब्ध करुन द्यावी. मोठ्या पावसामुळे रस्ते तुंबण्याच्या घटना घडू नयेत यासाठी पावसाळी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करुन घ्यावीत. जिल्हा परिषदेच्या तसेच नगरपरिषदांच्या अधिकारक्षेत्रातील तलावांतील गाळ काढावा. जलसंपदा विभागाला पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे लागते. त्यांनीही नदीत पाणी सोडण्यापूर्वी गतीने माहिती पोहोचवण्याची व्यवस्था करावी.


जुन्या इमारती, वाड्यांकडे विशेष लक्ष द्यावे. पूलांचे स्ट्रक्टरल ऑडिट, खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे तसेच अद्ययावत सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. पावसाळी पर्यटनस्थळावर होणारी गर्दी लक्षात घेता अपघात होणार नाही यासाठी पूर्व खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. त्या अनुषंगाने पोलीस विभागाने प्रमाणित कार्य प्रणाली तयार केल्यास उपयुक्त राहील. सर्व प्रांताधिकारी, तहसीलदारांनी आपल्या क्षेत्रातील पर्जन्यमापके सुस्थितीत असल्याची खात्री करावी. महावितरणने आपत्तीच्या स्थितीत वीजपुरवठा गतीने सुरळीत करावा. पुरवठा विभागाने डोंगराळ, दुर्गम भागात पुरेसा धान्यसाठा करुन ठेवावा, असेही ते म्हणाले.


केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे एखादी घटना घडताच तात्काळ ‘इन्सीडन्स  रिस्पॉन्स सिस्टीम’ (आयआरएस) या संगणकीय प्रणालीवर माहिती भरणे आवश्यक आहे. आपत्तीच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम आता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने बँक खात्यात जमा होणार असल्याने संबंधित विभागांनी माहिती अचूक आणि वेळेत भरण्याकडे लक्ष द्यावे, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.


जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त आपत्तीमित्रांना आपत्तीनिवारणाचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यात आले असून आपत्तीच्या परिस्थितीत त्यांची चांगल्याप्रकारे मदत घेता येईल, असेही ते म्हणाले.


यावेळी पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरपरिषदा, पीएमआरडीए, आरोग्य विभाग, पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलीस, एनडीआरएफ, प्रांताधिकारी, तहसीलदार, परिवहन विभाग आदी विभागांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात