संत गाडगेबाबा जयंती निमित्त ग्रामीण भागात स्वच्छतेसंबंधीत कामांचा शुभारंभ
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. 24: संत गाडगेबाबा जयंती निमित्त काल गुरुवारी जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प आदी विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच शुभारंभ गावस्तरावर करण्यात आला, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 ची गतीने अंमलबजावणी सुरु असून या अंतर्गत गावस्तरावर वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प आदी राबवून गावात शाश्वत स्वच्छता ठेऊन गावे ‘हागणदारीमुक्त अधिक’ (ओडीएफ+) घोषित करण्यात येत आहे.
2022- 23 मध्ये जिल्ह्यातील गावांत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे ‘ओडीएफ+’ घोषित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार 2022-23 मध्ये जिल्ह्यात 1 हजार 125 वैयक्तिक शौचालय बांधकाम करून ते वापरात आणण्यात आलेले आहेत. तसेच 65 वैयक्तिक शौचालय बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या 253 सार्वजनिक शौचालय युनिट पैकी बांधकाम पूर्ण झालेल्या 124 सार्वजनिक शौचालयांचे लोकार्पण आणि 63 युनिट बांधकामांचा शुभारंभ काल करण्यात आला. गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची 367 कामे पूर्ण झाली असून पैकी 167 घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प युनिटचे लोकार्पण तर 96 नवीन कामांचा शुभारंभ करण्यात आला.
तसेच 2022- 23 मध्ये गावस्तरावर सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पा करिता गावाचे सर्वेक्षण प्रकल्प अहवाल व प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता बाह्य संस्थांची नियुक्ती करुन त्यांच्या कडून 2 कामांचे लोकार्पण व 73 कामांचा शुभारंभ करण्यात आला. याव्यतिरिक्त गाव स्तरावर नादुरुस्त असलेले शौचालय दुरुस्त करण्यात येत आहेत. एक शोषखड्डा व सेफ्टी टॅंक असलेल्या शौचालयांचे दोन शोषखड्डा शौचालयामध्ये रूपांतर करण्याचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा