चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वाटप

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



 पुणे दि. २५: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.


थेरगाव येथील स्व.शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे ३ हजार प्रशिक्षणार्थींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त विठ्ठल जोशी यांनी तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. 


प्रशिक्षणानंतर मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे केंद्रनिहाय वाटप करण्यात आले.  मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे काम थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. साहित्य वाटप करण्याकरीता १११ कर्मचारी तर स्वीकृतीसाठी १४८ कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे. 


साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून २६ टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात केली. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची नोंद साहित्य वाटप नोंदवहीत घेण्यात आली. मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रीयेविषयीचे विविध पाकीटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात आले.


 मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये पीएमपीएमएलच्या १०२ बसेस, ८ मिनीबस आणि १२ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतुक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आला होता. या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी ५१ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यासाठी ३ हजार ७०७ पोलीस कर्मचारी व ७२५ अधिकाऱ्यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. 


प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पोटनिवडणुक मतदानाच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली असून ही निवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता या मतदार संघातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.


*टपाली मतदानाची सुविधा*

निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी २४८ कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठी फॉर्म वाटप करण्यात आले होते. त्यांच्यासाठी साहित्य वितरण ठिकाणी टपाली मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान या कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठीचे अर्ज देण्यात आले होते. त्यानुसार काही कर्मचाऱ्यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.


*सखी मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र*

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी यावेळी थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयांमध्ये १९५ क्रमांकाचे मतदान केंद्र 'सखी मतदान केंद्र' म्हणून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्या केंद्राची विशेष रचना तयार करण्यात आली आहे. रावेत येथील बबनराव भोंडवे शाळेमधील २३ क्रमांकाचे केंद्र तसेच वाकड येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ३९५ आणि ४०५ क्रमांकाचे केंद्र आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग स्टेशन) म्हणून तयार करण्यात आले आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात