कसबा पेठ मतदारसंघात मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे,दि.२२: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रप्रमुखांमार्फत मतदार मार्गदर्शिका आणि मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करून मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मतदारसंघातील २७० मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले आहे. मतदारांना मार्गदर्शिकेच्या माध्यमातून मतदान कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांना मतदार यादीतील नाव, क्रमांक आणि मतदान केंद्र याविषयीदेखील माहिती देण्यात येत आहे. यासाठी मतदान केंद्र अधिकारी घरोघरी भेट देत असून नागरिकांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
आतापर्यंत ६९ हजार मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले असून एकूण अडीच लाखाहून अधिक मतदारांपर्यंत निवडणूक कर्मचारी पोहोचणार आहेत. नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्याचा हा निवडणूक प्रशासनाचा प्रयत्न आहे. याला जनजागृती उपक्रमांचीही जोड देण्यात आली असून मतदारसंघातील विविध भागात उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
मतदारांना माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शिका तयार केली आहे. यात मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सुविधा, मतदार नोंदणी, मतदार हेल्पलाईन, दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, टपालाद्वारे मतदान, मतदान प्रक्रिया, मतदार ओळखपत्र, पारदर्शक निवडणुकीसाठी सी-व्हिजिल अँपची सुविधा, मतदार प्रतिज्ञा आदी माहिती देण्यात आली आहे.
नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग महत्वाचा असून कसबा पेठ मतदारसंघातील मतदारांनी २६ फेब्रुवारी रोजी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा