चारचाकीं वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी / राजू शिंगाडे

 पुणे दि. ७: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


नव्याने सुरु होणाऱ्या चारचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३०  वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. 


अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी  ‘आर.टी.ओ. पुणे’यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दूरध्वनी देयक आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.


एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्यांची यादी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० नंतर कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रक्कमेचा एकच डीडी ‘आर.टी.ओ. पुणे’यांच्या नावे ११  नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. डीडी किमान ३०१ रुपये पेक्षा जास्त रकमेचा असावा. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता प्रादेशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सहकार सभागृह येथे संबंधीत अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विहित शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.


एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नसल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात