'अधिकार व कर्तव्ये' या विषयावर संविधान विषयक व्याख्यान संपन्न
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. ३०: सामाजिक न्याय विभागातर्फे २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत 'सामाजिक न्याय पर्व' म्हणून साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालयामार्फत 'अधिकार व कर्तव्ये' या विषयावर संविधान विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुणे विद्यार्थी गृहाचे कार्यवाह प्राध्यापक राजेंद्र कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विविध चळवळींवर भाष्य करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या व्यापक विषयावर माहितीपर मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य व त्यांनी वंचित घटकांसाठी केलेल्या विविध चळवळी याबाबत सखोल माहिती दिली.
सत्यशोधक ढोक यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेतून ‘सत्यशोधक विवाह’ संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती देत त्यांनी सत्यशोधक विवाह संस्था व महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार यावर प्रकाश टाकला. समाजातील युवक-युवतींनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचे आवाहन केले. सत्यशोधक पद्धतीने लावण्यात येणारे विवाह मोफत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखर म्हणाल्या, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत असून मोठयाप्रमाणात लाभार्थी या योजनांचा लाभ घेत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा