राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुढारी हेल्थ आयकॉन पुरस्काराचे वितरण ; आरोग्य विषयक योजनांचा लाभ देण्याचे राज्यपालांचे डॉक्टरांना आवाहन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क



पुणे, दि.११:  प्रधानमंत्री आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना या सारख्या आरोग्य योजनांचा वंचित, गरीब, असाह्य घटकातील रुग्णांना लाभ देण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. 


पुढारी माध्यम समूहाच्यावतीने हॉटेल हयात येथे आयोजित 'पुढारी हेल्थ आयकॉन पुरस्कार' वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मविभूषण डॉ.कांतीलाल संचेती, मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, अध्यक्ष तथा समूह संपादक योगेश जाधव, समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, पुणे आवृत्तीचे संपादक सुनील माळी आदी उपस्थित होते.


श्री. कोश्यारी म्हणाले, कोरोनाच्या काळात देशात डॉक्टर, परिचारिका, पोलीस, प्रशासन यांच्यासह समाजातील सर्व घटकामध्ये राष्ट्रभावना निर्माण होवून एकजुटीने आपआपल्या पद्धतीने सेवा करत होते. डॉक्टरांचे कार्य पवित्र व पुंण्याचे आहे. लोक डॉक्टरांकडे देव म्हणून जातात. प्रत्येक डॉक्टर आपल्याला क्षेत्रात तज्ज्ञ असतो. ते रुग्ण बरे होण्यासाठी उत्तम उपचार करतात. 


रुग्णसेवेतून डॉक्टरांना आनंद मिळतो. स्वतःचे आर्थिक हित आणि उपचार यामध्ये संतुलन राखत डॉक्टर  रुग्णसेवा करतात. डॉक्टरांनी गरीब लोकांना आपल्या दवाखान्यात स्वस्त, परवडणारे उपचार करावे. त्यासाठी असलेल्या आरोग्य विषयक योजनांचे लाभ देवून त्यांचे जीवनमान सुकर करावे, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी केले.


पुढारी वृत्तपत्राची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात झाल्याचा उल्लेख करुन त्यांनी वृत्तपत्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


डॉ. संचेती म्हणाले, जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम पुढारीच्या माध्यमातून होत आहे, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. डॉक्टर देवदूत म्हणून कार्य करतात. रुग्णांची सेवा मनोभावाने करतात. त्यामुळे अनेक रुग्ण बरे होतात, असेही ते म्हणाले.


श्री. जाधव म्हणाले, स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत पुढारी समूह विविध क्षेत्रात आपले योगदान देत आलेले आहे. सियाचीनच्या रणभूमीवर उभारण्यात आलेले रुग्णालय जवानांसाठी संजीवनी ठरत आहे. या रुग्णालयामध्ये दरवर्षी अत्याधुनिक साधनांची भर पडत आहे. गुजरात राज्यातील भूकंपग्रस्त भुज भागात रुग्णालय उभारण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात विविध उपक्रम राबविण्यात आले. दिव्यांग नागरिकांसाठी राज्यव्यापी लसीकरण मोहीम घेण्यात आली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान डॉक्टरांचा सन्मान करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले


राज्यपाल यांच्या हस्ते पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती यांचा विशेष सन्मान करण्यात करण्यात आला. तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील डॉक्टरांचा सन्मानही करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात