जिल्हा ग्रंथोत्सवाचे १५ व १६ नोव्हेंबर रोजी आयोजन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. ११: महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोलेरोड, शिवाजीनगर, येथे ग्रंथोत्सव- २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि त्यासोबतच विविध साहित्यिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते होणार असून उदगीर येथे झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
ग्रंथोत्सवाचा समारोप १६ नोव्हेंबर रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. समारोप कार्यक्रमास राज्याचे ग्रंथालय संचालक द. आ. क्षीरसागर, जेष्ठ साहित्यिक आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित असतील अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे. श्री. गोखले यांनी दिली.
*कार्यक्रमांची मेजवानी:*
मंगळवार १५ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता ग्रंथदिडी, ११.३० वा. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन, दुपारी ३ ते ४ वा. 'सार्वजनिक ग्रंथालयांची उर्जित अवस्था' या विषयावर डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी ४ ते ५ वा. जी.एं.च्या कथांचे अभिवाचन, दुपारी ५ ते सायं. ६ वा. एकपात्री काव्य नाट्यानुभव ‘कुटुंब रंगले काव्यात’चे सादरीकरण होणार आहे.
बुधवार १६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजता ‘सुचलेलं काही....वेचलेलं काही..’ संल्पना संहिता सादरीकरण श्रीमती ऋचा थत्ते करणार आहेत. दुपारी १ ते २वा. श्रीमती अपर्णा निरगुडे व अजित कुंटे यांpk कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ ते ४ वा. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा लेखाजोखा ‘दीर्घांक- मी भारतीय’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचे संकल्पना व दिग्दर्शन रविंद्र देवधर करणार आहेत. दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांच्या दर्जेदार पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यत असून प्रवेश विनामूल्य आहे. तरी सर्व नागरिक व ग्रंथप्रेमी रसिकांनी या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा व ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्रीमती गोखले यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा