प्रत्येक गावात ग्रंथालय सुरू करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील ; वाचन प्रेरणा दिनानिमित्त मुक्त संवाद कार्यक्रमात वाचन संस्कृती विकसीत करण्याची ग्वाही
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे दि.१५: उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात आयोजित वाचन प्रेरणा दिन आणि मुक्त संवाद कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. ग्रामीण भागापर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात ग्रंथालय उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. अपर्णा राजेंद्र आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यात १२ हजार गावांमध्ये ग्रंथालये आहेत आणि साधारण २७ हजार ग्रामपंचायती असणारी गावे आहेत. वाड्या धरून ४३ हजार गावे आहेत. ग्रामपंचायत असणाऱ्या प्रत्येक गावात किमान ‘ड’वर्गाचे ग्रंथालय सुरू झाले पाहिजे असे उद्दीष्ट ठेवण्याच्या सूचना ग्रंथालय संचालनालयाला दिल्या आहेत. त्यांना पहिल्या दिवसापासून ‘ड’ वर्गाचे अनुदान देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात चारही वर्गातील ग्रंथालयांना अनुदान वाढविण्यात आले आहे.
*फिरत्या ग्रंथालयांना प्रोत्साहन देणार*
पुण्यात दोन ठिकाणी फिरते ग्रंथालय चालविण्यात येत आहे. अशा फिरत्या ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीची सर्व पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पॉलिटेक्निकची परीक्षादेखील मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे. इंग्रजीतील ज्ञान मराठी भाषेतून सांगणारे यंत्रदेखील विकसीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे आणि महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तके वाढली पाहिजेत.
*धनंजय कीर यांचे चरित्रलेखन आवडीचे*
धनंजय कीर यांनी लिहिलेली चरित्रे संशोधनपर असल्याने त्यातून चांगली माहिती मिळते. त्यांनी लिहिलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र आवडीचे आहे. तसेच देशभर सामाजिक समतेसाठी झालेल्या प्रवासात त्यांनीच लिहिलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा खूप उपयोग झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत प्रत्येक पुस्तक वाचण्याचा प्रयत्न असतो, असे श्री.पाटील यांनी आपल्या वाचनाच्या आवडीविषयी बोलताना सांगितले.
*आवड असली तर वेळ काढता येतो*
समाजमाध्यमांमुळे वाचन कमी होत आहे काय, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर मंत्री श्री.पाटील म्हणाले, वाचन हा आवडीचा आणि वेळेचाही विषय आहे. वाचनाची आवड असल्यास समाजमाध्यमांचा परिणाम होत नाही. आवड असली तर वाचनासाठी वेळ काढता येतो. अलिकडच्या काळात लोकप्रतिनिधींना वाचनासाठी वेळ मिळणे कठीण असते. अशावेळी एखाद्या वाचन करणाऱ्या व्यक्तीकडून विषय समजावून घेतल्यास त्याचा उपयोग होतो. भाषणासाठी लागणारे संदर्भ वाचनातून चांगल्यारितीने मिळतात.
अटल बिहारी वाजपेयी यांचे वाचन मोठ्या प्रमाणात होते. ते वाचनासाठी वेळ कसा काढतात याचेही आश्चर्य वाटायचे. अलिकडच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाचन खूप आहे. अलिकडच्या काळातील संदर्भही त्यांच्या भाषणात येतात असे सांगताना ज्ञानेश्वरीपासून आपल्या वाचनाची सुरूवात झाली, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमापूर्वी मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा