लंपी संदर्भातील उपाययोजनांमुळे जिल्ह्यात आजार नियंत्रणात ; सध्या फक्त ८२७ बाधित जनावरे
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. १५: पशुधनातील लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलत गतीने १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्यामुळे जिल्ह्यात हा आजार नियंत्रणात येत आहे. पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्यामुळे लंपी बाधित जनावरांची संख्या कमी झाली आहे.
जिल्ह्यात पशुधनातील लंपी चर्मरोगाची प्रकरणे आढळून येताच तातडीने ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लंपी संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटरचा परिसर बाधित व निगराणी क्षेत्र घोषित केले. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर केले. लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांची खरेदी विक्रीसाठी बाजार, प्राण्यांचे प्रदर्शन, जत्रा, प्राण्यांच्या शर्यती यावर निर्बंध आणले गेले. तात्काळ लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. लंपीबाबत उपाययोजनांसाठी तज्ज्ञांचे ५ चमू बनवून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण हाती घेतले.
जिल्ह्यातील १३ तालुक्यातील १६३ गावातील जनावरे लंपी चर्मरोगाने बाधित झाले होते. त्यामध्ये ४ हजार २२३ जनावरांना हा आजार झाला होता. तातडीने लसीकरण हाती घेत ८ लाख २८ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. वेळीच लसीकरण मोहिम हाती घेतल्याने वेगाचा प्रादुर्भाव नियंत्रित क्षेत्राबाहेर अधिक वाढला नाही. आज लंपीबाधित ८२७ सक्रीय (ॲक्टीव्ह) जनावरे आहेत. तथापि, लसीकरणानंतर पशुधनातील आजाराची गुंतागुंत होत नसून जनावरे बरी होत आहेत. जिल्ह्यात वेळेवर उपाययोजना केल्याने पशुधनाच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
बाधित जनावरांपैकी ३ हजार १४५ जनावरे बरी झाली असून १८४ दगावली आहेत. सक्रीय (ॲक्टीव्ह) जनावरांपैकी त्यापैकी ६४ गंभीर आजारी आहेत. लंपीमुळे मृत्यू झालेल्या १२८ जनावरांच्या मालकांना ३० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर, निमगाव, बारामती तालुक्यातील खांडज, लोणीभापकर व वडगाव निंबाळकर तसेच खेड तालुक्यातील किवळे गावे लंपी प्रादुर्भावाची हॉटस्पॉट ठरली होती. इंदापूर तालुक्यात सर्वाधिक १ हजार १७२ जनावरे बाधित झाली होती. त्याखालोखाल बारामती ६८३, खेड ६७४, जुन्नर ३६३, दौण्ड ३२४, हवेली २७८, शिरूर २७१, मावळ १५९, पुरंदर १२२, आंबेगाव १०१, मुळशी ६१, भोर १४ तर वेल्ह्यामध्ये एक जनावर लंपीने बाधित झाले होते, अशीही माहिती श्री. विधाटे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा