आर्थिक समावेशनासाठी १५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील १ हजार २९४ गावांमध्ये मेळावे ; भारत सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे नागरिकांना आवाहन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. १४: भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाद्वारे १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘आर्थिक समावेशनातून सशक्तिकरण’ या प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १ हजार २९४ ग्रामपंचायतींमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या मेळाव्यात उपस्थित राहून योजनांच्या लाभासाठी अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सुमारे २१ बँकांचा यात सहभाग आहे. राज्य शासनाचे महसूल, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व मत्स्य विभाग तसेच गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, कृषी सहाय्यक या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी यासाठी सहकार्य करतील.
या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री जनधन बचत खाते, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अटल पेन्शन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी पात्र असलेल्या परंतू अद्याप त्यामध्ये सहभाग नोंदवलेला नाही अशा सर्व ग्रामस्थांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सहभागी करून घेतले जाणार आहे. या मेळाव्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पीक कर्जबरोबर च दुग्ध, पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन व मत्स्यव्यवसाय इत्यादी या व्यवसायांसाठी खेळते भांडवल मिळण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत व बचत गटांना खेळते भांडवल व व्यवसायासाठी कर्जाचे अर्ज स्वीकारले जातील.
१५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २८८ गावांमध्ये, २९ ऑक्टोबर रोजी २४४, ५ नोव्हेंबर रोजी २१५ , १२ नोव्हेंबर रोजी १८९ , १९ नोव्हेंबर रोजी १८२ तर २६ नोव्हेंबर रोजी १७६ गावांमध्ये हे मेळावे होणार आहेत. जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, सहकारी व ग्रामीण बँकांच्या सहकार्यातून शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांच्या गावातील आयोजित शिबिराच्या दिवशी या योजनांमध्ये अर्ज करून सहभाग नोंदवावा. या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा