मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ;१० नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / मुस्तफा चाबरू
पुणे, दि. १८: मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये अधिकाधिक नागरिक सहभागी व्हावे व मतदार नोंदणी करावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २५ जुलै रोजी घोषित केला आहे. त्यानुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्राम सभा आयोजित करून विविध कार्यक्रम राबविण्याबाबत ग्राम विकास विभागाने निर्देश दिले आहेत.
या उपक्रमांतर्गत राबवावयाच्या उपक्रमांबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विविध सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील तृतीयपंथी, दिव्यांग, वंचित आदींसाठी काम करणाऱ्या विविध संस्थासोबत बैठक आयोजित करून अधिकाधिक नागरिकांनी सहभागाबाबत आवाहन करण्यात यावे. ग्रामपंचायत क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या मतदार यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करावे व ही यादी गावातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी व तपासण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावी.
मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरीकांना हरकती असल्यास, त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदवावयाचे असल्यास, मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावांची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांचे नाव समाविष्ट करणे आदींसाठी विहीत अर्जाचे नमुने तेथेच ग्रामसभेत उपलब्ध करुन द्यावेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, गाव कामगार तलाठी तसेच ग्रामसेवक हे नागरिकांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करतील.
नागरीकांना संबधित मतदार नोंदणी अधिकारी व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे नाव, संपर्क क्रमांक उपलब्ध करुन द्यावेत. संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी ग्रामसभेमध्ये गावातील नागरिकांनी दिलेल्या हरकती, आक्षेप, दुरुस्ती वा नाव नोंदणींच्या अर्जाची स्थितीबाबत त्या नागरिकांना कोठून व कशी माहिती मिळेल याबाबत मार्गदर्शन करावे, असेही निर्देश दिल्याची माहिती जिल्ह्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा