पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी /राजू शिंगाडे
पुणे, दि. 11: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे नौरोसजी वाडिया कॉलेज सह अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत नौरोसजी वाडिया कॉलेज, टाटा असेंब्ली हॉल, वाडीया कॉलेज कॅम्पस येथे 'पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे.
मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स, टॅलेंट कॉर्प सोल्युशन व भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन अॅण्ड स्पोर्टस असोसिएशन, पुणे यांनी या मेळावा आयोजनामध्ये सहभाग घेतला आहे. मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी त्यांच्याकडे रिक्त असलेल्या 6 हजार 643 पदांसाठी सहभाग नोंदविला आहे. ही सर्व रिक्तपदे किमान दहावी, बारावी, कोणत्याही शाखेतील पदवी अथवा पदव्युत्तर, आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी पदवी, बीसीए आदी विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी विभागाच्या http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपापले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवावेत. मुलाखतीस येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डाच्या प्रती सोबत आणाव्यात.
खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांचे सहायक आयुक्त सा.बा. मोहिते यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा