रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा ; रिक्षात विसरलेला एक लाख रुपये किमतीचा लॅपटॉप प्रवाशास दिला परत
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / शफीक पटेल
पुणे : पुणे स्टेशन येथे प्रवासी घेण्यासाठी थांबलेला असताना रिक्षा चालक मोबीन पटेल यांच्या रिक्षामध्ये प्रीतेश रांका नावाचे प्रवासी बसले व तेथून त्यांना कोंढवा येथील शांतीबन सोसायटी येथे जायचे होते. रिक्षातून उतरल्यानंतर गडबडीमध्ये प्रवासी प्रीतेश रांका हे आपल्या रिक्षामध्ये लॅपटॉप तसेच विसरले. रिक्षा चालकाने आपल्या रिक्षामध्ये प्रवाशाचे लॅपटॉप विसरले आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष श्री. शफिक भाई पटेल यांच्याशी संपर्क साधला. समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री. रमेश साठे साहेब यांच्याशी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष शफिक भाई पटेल यांनी संपर्क साधून सदर प्रकाराबाबत माहिती दिली व सदर प्रवाशास समर्थ पोलीस स्टेशन येथे बोलावून प्रवाशाचा विसरलेला अंदाजे एक लाख रुपये किमतीचा लॅपटॉप प्रामाणिकपणे परत दिला.
रिक्षा चालक मोबीन आयुब पटेल ( सध्या राहणार : मंगळवार पेठ मालधक्का चौक पुणे ) हा स्वतः दौंड तालुक्यातील गिरीम या गावाचा रहिवासी असून काही वर्षांपूर्वी परमिट घेऊन फायनान्सचे कर्ज घेऊन नवीन रिक्षा काढली होती व रिक्षा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. परंतु कोरोना काळात रिक्षाचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे त्यांची रिक्षा फायनान्स कंपनीने जप्त केली व कर्जदार मोबीन पटेल यांना कोणतीही माहिती न देता परस्पर ती दुसऱ्यास विकल्याने रिक्षा चालक मोबीन पटेल हा दिवसभर नोकरी करून संध्याकाळी शिफ्ट ने रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करीत आहे.
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तसेच लायसन्स बॅच नसताना रिक्षा चालवणाऱ्या तोतया रिक्षाचालकांकडून प्रवाशांना लुटण्याचे किंवा इतर प्रकारचे गुन्हे याबाबत वृत्तपत्रात बातम्या येत असल्याने रिक्षा चालकांबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी तसेच राग सुद्धा आहे. परंतु त्यासोबतच मोबीन पटेल सारख्या प्रामाणिक रिक्षा चालकाने प्रवाशांची चीज वस्तू परत केल्याने रिक्षा चालकांबाबत हे चांगले उदाहरण आहे, असे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष शफिक भाई पटेल म्हणाले.
यावेळी प्रवासी प्रितेश रांका, शशांक रांका हे खूपच भावनिक झालेले होते व त्यांनी रिक्षा चालक मुबीन पटेल यांचे मनापासून धन्यवाद व कौतुक केले. तसेच समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश साठे साहेब व गुन्हे पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम साहेब यांनी रिक्षा चालकाची पाठ थोपटली व त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष शफिक भाई पटेल तसेच उपाध्यक्ष अरशद अन्सारी, मुराद काजी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा