चांदोली राष्ट्रीय अभयारण्य परिसरात दुर्मिळ ग्रेट हॉर्नबिल पक्षाचे दर्शन

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


प्रतिनिधी- विशाल खुर्द 



 शिराळा/ वारणावती  : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट असलेल्या चांदोली राष्ट्रीय अभयारण्य परिसरातील मणदूर गाव परिसरात ग्रेट हॉर्नबिल या जागतिक दृष्टीने धोक्यात असलेल्या पक्षाचे दर्शन झाले आहे. अभयारण्या बाहेरील  गावांमध्ये  सुद्धा महत्वपूर्ण जैवविविधता आढळते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.सदर परिसरातील जैवविविधता जपणे आणि महा वृक्षांची तोड थांबवणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी गाव परिसरातील वृक्षतोड करू नये असे आवाहन प्लानेट अर्थ फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रणव महाजन यांनी केले आहे.

सदर पक्षाचा फोटो व व्हिडीओ संस्थेचे सदस्य अमित माने तसेच चांदोली चे प्रसिद्ध गाईड गणेश पाटील यांनी काढला आहे.


एक मीटर लांबीचा पंखांचा विस्तार असलेला हा धनेश पक्षिकुळातील एक पक्षी आहे. याला मराठीमध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राज धनेश या नावांनीही ओळखले जाते. अतिशय सुंदर रंगांनी हा पक्षी लक्ष वेधून घेतो. विविध प्रकारची फळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. झाडाच्या ढोलीत तो घरटे बांधतो व चिखलाने झाकून टाकतो व पिल्लांसाठी केवळ अन्न देता येईल एवढी एकच लहान उभी फट ठेवतो. या फटीतून पिल्लांना चारा पुरवला जातो. पक्ष्यांची चोच फार मोठी व सिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिलेले आहे. या पक्ष्यांचे एकंदर स्वरूप असामान्य असते. ब्यूसेरॉटिड़ि या पक्षिकुलात यांचा समावेश केलेला आहे. लांबी सुमारे १३० सेंमी असते. डोके, पाठ छाती वा पंख काळे असून पंखांवर आडवा पांढरा पट्टा असतो. डोके व मान पिवळे, पोट पांडरे असते, शेपटी लांब व पांढरी असून तिच्या टोकाजवळ काळाआडवा पट्टा असतो. नराचे डोळे तांबडे व मादीचे पांढरे असतात. चोच मोठी मजबूत बाकदार व वरील बाजू पिवळी असते, डोके आणि चोचीचे बूड यांवर एक मोठे शिरस्त्राण असते, त्याचा रंग पिवळा असून वरचे पृष्ठ खोलगट असते, पायांचा रंग काळपट असतो.घनदाट अरण्यात राहणारा पक्षी असून फार मोठ्या व उंच झाडांवर जोडी करून राहतात. याच्या असामान्य स्वरूपामुळे तो सहसा नजरेतून सुटत नाही. उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज अर्धा किमी वर तरी ऐकू जातो.


फायकस कुलातील वड, पिंपळ, उंबर, पायर तसेच भेरली माड ची फळे हा जरी यांचा मुख्य आहार असला, तरी ते किडे, सरडे किंवा इतर अन्न खात असल्यामुळे त्यांना सर्वभक्षी म्हणता येईल. फळे किंवा इतर खाद्यपदार्थ खाण्याची यांची रीत मोठी विलक्षण आहे. ते पदार्थ चोचीने वर उडवून आ वासतात व तो घशात पडला म्हणजे गिळतात.


प्रियाराधनानंतर नर मादीचा जोडा जमतो. अंडी घालण्याच्या सुमारास मादी एखाद्या उंच झाडाच्या खोडातल्या डोलीत जाते. ही ढोली यांचे घरटे होय. स्वतःची विष्ठा आणि नराने आणलेला चिखल यांच्या मिश्रणाने ती ढोलीच्या कडा लिंपते. चोच आतबाहेर करता येईल एवढीच उभी फट त्यात ठेवते. मादी या वेळी खरीखुरी बंदिवान होते. नर वरचेवर खाद्यपदार्थ आपल्या चोचीतून आणतो आणि ती फटीतून चोच बाहेर काढून ते खाते. पिल्ले सुरक्षित बाहेर पडेपर्यंत तिला भरवावे लागत असल्यामुळे नर यात जास्त श्रमांमुळे थकुन जातो. बंदीवासात असताना मोठ्या धनेशाच्या मादीची पिसे गळून पडतात व नवी उगवतात.


पिल्ले भरवण्या योग्य झाल्यावर मादी ढोलीवरील लिंपण चोचीने फोडून बाहेर पडते, ती डोलीचे दार पुन्हा लिंपते, पिल्ले मोठी होईपर्यंत आतच राहतात. त्यानंतर पिल्ले मोठी होऊन बाहेर येईपर्यंत नर आणि मादी दोघे त्यांना भरवतात.


अश्या असामान्य पक्षाला जंगलाचे शेतकरी म्हटले जाते कारण महत्वाच्या झाडांची, वेलींची फळे खाऊन जंगलात त्याचे बीज प्रसारण करण्याचे महत्वपूर्ण कार्य हे पक्षी करतात. या पक्षांच्या संवर्धनासाठी जंगल आणि महा वृक्षांचे जतन होणे गरजेचे आहे आणि ती आपली सर्वांची जबाबदारी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात