विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे गळीत हंगाम 2021-22 गाळप केलेल्या ऊसाला प्रतिटन 172 रुपये 74 पैसे अंतिम हप्ता वर्ग करणार
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी / विशाल खुर्द
शिराळा : विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे गळीत हंगाम 2021-22 गाळप केलेल्या ऊसाला प्रतिटन 172 रुपये 74 पैसे अंतिम हप्ता वर्ग करत आहोत. शुक्रवार (ता. 16) पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, सर्व संचालक मंडळ यांचेसह कार्यकारी संचालक अमोल पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, केंद्र शासनाचे प्रतिकूल धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारीची होणारी कुचंबना यातून अत्यंत खडतर वाटचाल सुरू आहे. तरीही ‘विश्वास’ने सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास व कामगारांच्या ताकदीवर कारखान्याने दमदार वाटचाल केली आहे. विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना ऊस दराच्या रुपाने होत आहे. 2021-22 च्या गळीत हंगामात 5 लाख 82 हजार 882 मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले. त्यातून 6 लाख 57 हजार 500 क्विंटल साखर पोती ऊत्पादन झाले. कारखान्याची आधारभूत किंमत 2 हजार 972 रुपये 74 पैसे प्रतिटन आहे. पहिल्या हप्त्यापोटी 2 हजार 600 रुपये, दुसऱ्या हप्ता 200 रुपये अदा केले आहेत. आता अंतिम बिल 172 रुपये 74 पैसे प्रमाणे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना अदा करीत आहेत. त्याची एकूण रक्कम 10 कोटी 6 लाख रुपये शेतकऱ्यांचा खात्यावर शुक्रवार (ता. 16) पर्यंत जमा होईल.
आमदार नाईक म्हणाले, अडचणीतून वाटचाल करणारी सहकारी साखर कारखानदारी वाचवायची असेल तर साखरेची प्रति क्विंटल आधारभूत किंमत किमान 3 हजार 600 रुपये करणे गजेचे आहे. कारण प्रति क्विंटल साखर उत्पादनाचा खर्च 3 हजार 600 इतका येत आहे. त्यामुळे साखरेच्या आधारभूत किंमतीत वाढ होणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या देशातील बाजारपेठेत साखरेला म्हणावा तसा उठाव नाही. केंद्र सरकारचे निर्यात धोरण कचखाऊपणाचे आहे.
ते म्हणाले, विश्वासराव नाईक कारखान्याचे कार्यक्षेत्र शिराळा व शाहूवाडी तालुका डोगराळ व दुर्गम आहे. तरीही येथील शेतकरी कष्टाने ऊस पिकवत आहे. कारखान्यामार्फत पाणी योजना राबवून शेतीसाठी पाणी उपलबद्ध करून दिले आहे. त्यांनी सातत्याने ‘विश्वास’ उद्योग समुहावर प्रेम केले आहे. म्हणून विश्वासची पाळेमुळे घट व खोलवर रुजली आहेत. हंगामपूर्व कारखान्यातील सर्व कामे पूर्ण झाली असून हंगाम 2022-23 मध्ये 7 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी माझी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की, पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा