Sangali : ट्रॉली पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला लावली... इतक्यात भरधाव..... एकाचा जागीच मृत्यू

 


सांगली (प्रतिनिधी): पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे कराड-तासगाव महामार्गावर ट्रकने टॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात टॅक्टर चालकासोबत असलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा अपघात काल रविवार (दि.१९) रोजी घडला. अवधूत विनायक सदामते (वय-२२, रा- देशिंग, ता- कवठेमहांकाळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत टॅक्टर चालक महादेव शिवाजी चव्हाण (वय-४३, रा- लक्ष्मीनगर, पलूस) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ट्रॅक्टर (क्र. एमएच १० डीजी १४७८) व दोन ट्रॉलीमध्ये (क्र. एमएच १०ईके १३४४ व एमएच १० ईके १३४५) महादेव चव्हाण व अवधूत सदामते जात होते. यावेळी ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्याने सांडगेवाडी येथे कराड- तासगाव महामार्गावर डाव्या बाजूला चव्हाण यांनी ट्रॅक्टर-ट्रॉल्या उभ्या केल्या. चालक महादेव चव्हाण पंक्चर काढण्यासाठी दुकानदाराला बोलाविण्यास गेले. यावेळी अवधूत सदामते ट्रॅक्टर जवळ थांबला होता.


यावेळी पहाटे पलूसकडून तासगावच्या दिशेने बगॅस घेऊन निघालेल्या ट्रकने (क्र. एमएच ४६ एएफ १८३२) रस्त्याकडेला उभ्या असलेल्या या ट्रॅक्टर- ट्रॉलीस पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात अवधूत सदामते याचा जागीच मृत्यू झाला. ट्रकची धडक एवढी जोरदार होती, की ट्रॉलीची दोन चाके तुटून बाहेर आली होती, तसेच दुसरी ट्रॉली डावीकडून जवळपास ४०० फुटावर महामार्गाच्या उजव्या बाजूच्या शेतात फेकली गेली होती. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. फरार ट्रक चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोठी बातमी ..! राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला राहणार बंद, शिक्षण संस्था महामंडळाची तातडीच्या चर्चेची मागणी

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आयोजित भव्य राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा

Pune : पुण्यात गुरूवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद