सौ.अनिता गोरे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
वाई, दि.१२: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल नुकताच डायट फलटण यांनी जाहीर केला असून त्यामध्ये वाई तालुक्यातील अभेपुरी शाळेच्या उपक्रमशिल शिक्षिका सौ.अनिता गोरे यांच्या ' समजून आनंदाने वाचूया, गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचूया ' या नवोपक्रमाचा प्राथमिक गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळून राज्यस्तरासाठी या उपक्रमाची निवड करण्यात आली.
मोबाईलच्या अतिवापरामुळे आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे लिखित व मुद्रित मजकुराच्या वाचनाकडे दुर्लक्ष होते की काय ? ह्या जाणिवेतून जन्म घेतलेला हा नवोपक्रम शिक्षण आणि परीक्षा यांच्यापुरता मर्यादित न ठेवता परंपरा,उत्सव,सांस्कृतिक, सामाजिकता यांच्याशी जोडत भविष्यातील जगण्याचे व अर्थार्जनाच्या साधनांची पहिली पायरी उभारण्याचे काम या नवोपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे ह्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन इतर शाळांनी,मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी ह्या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.तसेच या उपक्रमाच्या धर्तीवरच महाराष्ट्र शासनाने २२नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय पारित करून महावाचन चळवळ हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये राबविणे विषयी सूचित केले आहे.तसेच या नवोपक्रमात समाविष्ट असलेले बरेच उपक्रम ह्या महावाचन चळवळ उपक्रमातही आहेत.
विद्यार्थ्यांत आवड निर्माण केली की ते स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतात आणि कोणत्याही उपक्रमाचे सोहळे अनुभवायला मिळतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ.अनिता यांचा हा नवोपक्रम.
नवोपक्रम यशस्वीतेसाठी त्यांना डायट फलटणचे अधिव्याख्याता मा. कृष्णात फडतरे व अन्नपूर्णा माळी,गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी,विस्तार अधिकारी मेमाणे,केंद्रप्रमुख भांगरे,मुख्याध्यापक,सहकारी शिक्षक ,पालक यांचे सहकार्य लाभले.
नवोपक्रमाच्या राज्यस्तरीय निवडीने तालुक्याच्या उपक्रमशीलतेत भर पडली असून या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम गुणवत्ता विकासात नक्कीच पाहायला मिळतील असा आशावाद व्यक्त करून सौ.गोरे यांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी श्री.महामुनी,अधिव्याख्याता श्री.फडतरे,विस्तार अधिकारी श्री.मेमाणे,केंद्रप्रमुख श्रीम.भांगरे, मुख्याध्यापक ,शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा