सहकार क्षेत्रात तरुणांना संधी देण्यावर भर-उपमुख्यमंत्री अजित पवार

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे ( प्रतिनिधी इस्माईल तांबोळी ), दि.१९ : भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असल्याने सहकार क्षेत्रात तरुणांना संधी देण्याचा अधिक प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


कुलगुरु वि. गं. तथा दादासाहेब केतकर सभागृह अरणेश्वर येथे आयोजित पुणे मर्चंटस को-ऑप बँक लि. शतक महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा व शतकोत्सवी बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे, उपाध्यक्ष सुधीर शेळके, संचालक मंडळ उपस्थित होते. 


श्री. पवार म्हणाले, सहकार क्षेत्रात काम करीत असताना राज्याचे हित लक्षात घेऊन पुढच्यादृष्टीने नवीन पिढीला मदत करण्यासाठी नवनवीन कल्पना राबविण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल. याबाबत आवश्यकता भासल्यास मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव मांडण्यात येईल. यामुळे तरुणाला सहकार क्षेत्रात संधी मिळण्यास मदत होईल. 


*सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी विश्वासहर्ता जपण्याची गरज*


महाराष्ट्रात सहकार क्षेत्रामुळे विविध बदल झाले आहेत. सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संचालक मंडळांनी विश्वासहर्ता जपली पाहिजे. बँकेचे कामकाज करतांना ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये, ही काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कर्जदारांनीदेखील वेळेत कर्ज परत करावे. यामुळे या क्षेत्रात आर्थिक शिस्त लागण्यास मदत होईल. सहकार क्षेत्राला आणखीन मजबूत करण्यासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन करून या क्षेत्रातील अडी अडचणी सोडण्यासाठी शासन सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.


*पुणे मर्चंटस को-ऑप बँकेची शतक महोत्सवी वर्षातील वाटचाल सहकार क्षेत्रातील महत्वाचा टप्पा*


पुणे मर्चंटस को-ऑप बँकेला शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल शुभेच्छा देतांना ते म्हणाले, या बँकेच्या वाटचालीमध्ये बँकेच्या आजी-माजी अध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शतक महोत्सवी वर्षातील वाटचाल सहकार क्षेत्रातील महत्वाचा टप्पा असून  बँकेने आणखीन खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. बँकेचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय करण्याबरोबरच छोट्या व्यवसायिकांना, तरुणांना तसेच पत नसलेल्याही कर्ज देण्याबाबत संचालक मंडळांनी विचार करावा. शतक महोत्सवी वर्षात विविध लोकाभिमुख काम करावे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले. 



*शहरातील विकासकामे जलद गतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न*


सर्वांना विश्वासात घेऊन शहरात विविध विकासकामे करण्यात येत असून ही कामे जलद गतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या कामांमुळे शहरात प्रदूषण वाढत असून काम करतांना संबंधितांनी याबाबत खबरदारी घ्यावी. नागरिकांनी याबाबत सूचना असल्यास प्रशासनाला कळवाव्यात, असे आवाहन श्री. पवार यांनी केले. 


श्री. अनास्कर म्हणाले, आधुनिक काळात सहकार क्षेत्रात स्मार्ट बॅंकिंग करण्यासाठी तसेच या क्षेत्रात तरुणांना संधी मिळण्यासाठी संचालक मंडळांनी बँकेत अभियंता आणि तरुणांसाठी राखीव ठेवण्याबाबत विचार करावा. मतदारांमध्ये पुरुष, स्त्री यासोबत तरुणांचा समावेश करावा. सहकारी क्षेत्रातील तत्वाविषयी शालेय जीवनापासूनच सुरुवात करण्याबाबत विचार व्हावा, असेही ते म्हणाले. 


बँकेचे अध्यक्ष श्री. ढेरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.  त्यांनी बँकेच्या वाटचालीबाबत माहिती दिली. शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे श्री. ढेरे म्हणाले. 


यावेळी दीपक मानकर यांनीही विचार व्यक्त केले.


यावेळी पुणे मर्चेंटस को-ऑप बँक लि. शतक महोत्सवी वर्षानिमित्त शतकोत्सवी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला दत्तात्रय धनकवडे, अंकुश काकडे, बाबुराव चांदोरे, रवींद्र रच्चा, हेमंत जगताप आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात