‘पी.एम.-किसान’ योजनेच्या लाभासाठी ‘ई-केवायसी’ करण्याचे कृषी आयुक्तांचे आवाहन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. ९ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.-किसान) योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच ‘ई-केवायसी’ सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे. याबाबत राज्यात १५ जानेवारीपर्यंत गावपातळीवर सुरु असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने ‘पी.एम.-किसान’ योजना सुरु केली आहे. नोंदणी केलेले लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई-केवायसी केलेले शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. पी. एम. किसान योजनेचा १६ वा हप्ता जानेवारी महिन्यात वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे.
या योजनेंतर्गत पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्यांचा समावेश असेल अशा सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६ हजार रुपये लाभ अदा करण्यात येत आहे.
भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यास अद्यापही वाव असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. ईकेवायसीसाठी नजीकच्या सामाईक सुविधा केंद्राशी आणि बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पूर्तता करावी.
अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा