धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. १२ : वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सूरू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती समाजकल्याण विभागाने दिली आहे.
महानगरपालिका, विभागीय शहरे व जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेताना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा आणि विद्यार्थी शासकीय वसतिगृह योजनेपासून वंचित असलेला भटक्या जमाती 'क' प्रवर्गामधील धनगर समाजातील असावा.
या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येते. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या ६ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयात मुलभूत पात्रता, शैक्षणिक निकष व इतर निकष नमूद केले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी मंजूरीबाबत समिती गठीत करण्यात आली असून समितीचे सदस्य सचिव सहायक आयुक्त समाजकल्याण पुणे आहेत.
पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, स.नं. १०४/१०५, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशन समोर, येरवडा, पुणे या कार्यालयाशी सपंर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा