भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील भरती परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


पुणे, दि. ४: भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेचे ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० या कालावधीत राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भोलावडे (ता. भोर) येथे आयोजन करण्यात आले आहे.


भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीसाठी ३ जुलै २०२३ रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येऊन ४ ते १८ जुलै २०२३ या कालावधीत रिक्त पदांसाठी अर्ज मागविणेत आले होते. प्राप्त अर्जाची छाननी होऊन पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली होती. परंतु, या उपविभागातील पावसाची स्थिती लक्षात घेता सदर लेखी परीक्षेस जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली होती. आता याबाबत पुन:श्च कालबद्ध वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


नव्या वेळापत्रकानुसार पात्र उमेदवारांना ६ ऑक्टोबरपर्यंत टपालाद्वारे ओळखपत्र/ प्रवेशपत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्रवेशपत्र टपालाने प्राप्त न झाल्यास ६ ऑक्टोबर रोजी भोर उपविभागीय अधिकारी कार्यालयातून प्राप्त होतील. लेखी परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे होणार आहे. मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


कागदपत्रांची पडताळणी व तोंडी मुलाखत १२ ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस धरुन) सकाळी १०:३० पासून घेण्यात येणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची निवड यादी १८ ऑक्टोबर रोजी सायं ६ वा. नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी सुधारित कालबद्ध कार्यक्रमाची नोंद घ्यावी, असे आवाहन भोर उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात