भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांसाठी मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. १७: जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीमधील नव मतदाराची नोंदणी करण्याच्यादृष्टीने मतदारसंघात शिबीरांचे आयोजन करुन मोहिम स्वरुपात मतदार नोंदणीचे काम करावे. शिबीरांचे आयोजन करतांना त्या समाजातील सामाजिक संस्थाची मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
भारत निवडणुक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. याचाच एक भाग म्हणून मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात यावे. मतदार नोंदणी अभियान यशस्वीरित्या पूर्ण होण्याच्यादृष्टीने त्या-त्या भागात परिस्थितीनिहाय सोयीची वेळ व तारीख निश्चित करण्यात यावी. रोजगार खंडित न होता, भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांच्या वस्त्या असलेल्या त्याठिकाणी जाऊन शिबीरे आयोजित करावीत.
शिबिरांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, आठवडी बाजार आदी माध्यमाची मदत घ्यावी. विधानसभा मतदारसंघातील भटक्या विमुक्त जमातीमधील अधिकाधिक नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी स्थळपाहणी, विचारविनिमय, संवाद, प्रबोधन करून मतदार नोंदणी कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हवेली, उरुळी कांचन, तासणगाव, शिर्देवाडी, अष्टापूर, पिंपरी, हिंगणगाव, उरुळीकांचन खडकी बाजार, कोथरुड इंदिरानगर, निगडी, बारामती, दौंड, तळेगांव, सणसवाडी, शिक्रापूर, निमगाव, येरवडा ( इंदिरानगर), आलेगाव पागा आदी भागात शिबिराचे आयोजन करुन मतदार नोंदणी अभियान राबवावा, असे निर्देश डॉ.देशमुख यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा