राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य अधिकारी आर.विमला यांची हातकागद संस्थेला भेट
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि.३: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांनी मंडळाच्या पुणे येथील हातकागद संस्थेला भेट दिली.
आर. विमला यांनी हातकागद संस्थेच्या कागद निर्मिती, प्रक्रिया तसेच तयार होणाऱ्या विविध वस्तू, वह्या, पुस्तके, रोजनिशी, फाईल्स, विविध प्रकारचे कागद आदींची पाहणी केली. संस्थेच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी काही सुधारणांबाबत मार्गदर्शन केले. मंडळाच्या महाखादी व मध विक्री केंद्रास भेट देऊन विक्रीबाबत काही सूचनाही दिल्या.
संस्थेत हातकागदापासून बनविलेल्या आकर्षक व सुबक अशा पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे कौतुक करून गणेश भक्तांनी या मूर्ती विकत घ्याव्यात व पर्यावरण संतुलनास हातभार लावावा, असे अवाहन त्यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) तेजस्विनी उत्पादनेअंतर्गत तेजस्विनी कला दालन आणि खाद्य पदार्थाचे विक्री केंद्र बालगंधर्व रंगमंदिराजवळ सुरू केलेले आहे. याठिकाणी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट हस्तकला वस्तू, बॅगा, वस्त्रप्रावरणे, खेळणी, अलंकार, ग्रेटर्स, गृहउपयोगी वस्तु, बांबुच्या आकर्षक वस्तू, वारली चित्र, खाद्यपदार्थ स्टॉल पौष्टिक तृणधान्य व त्याची उत्पादने ठेवण्यात आलेली आहेत.
या ठिकाणी आजपासून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मध संचालनालय महाबळेश्वर येथील एगमार्क सेंद्रीय मध १ किलो, ५०० ग्रॅम आणि २५० ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध करून देण्यात आला. आर. विमला यांनी या दालनाचे उदघाटन केले. नागरिकांनी येथून सेंद्रीय मध खरेदी करावा, असे अवाहन त्यांनी केले.
मंडळाच्या जिल्हा कार्यालयासही सदिच्छा भेट देऊन त्यांनी मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा