सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिवसृष्टीला भेट ;विद्यार्थ्यांचे संस्कारक्षम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शिवसृष्टीला भेट द्या-सांस्कृतिक कार्य मंत्री
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि.५: छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेऊन त्याचे संस्कारक्षम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शिक्षण संस्थानी विद्यार्थ्यांना शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आणावे आणि या शिवकार्यात आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मुनगंटीवार यांनी आंबेगाव येथील शिवसृष्टीला भेट दिली. यावेळी शिक्षण संस्था व शिक्षण मंडळ प्रमुखांबरोबर आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, अनिल पवार उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार म्हणाले, एकविसाव्या शतकात वैचारिक प्रदूषणाचा धोका वाढला असताना आदर्श जीवनासाठी मार्गदर्शन करणारा शिवरायांचा विचार समाजासमोर मांडणे गरजेचे आहे. हे कार्य शिवसृष्टीच्या माध्यमातून होत आहे. उत्तम समाज घडविण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यार्थी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करीत असताना त्याला संस्काराचा विचार देणे तेवढेच महत्वाचे आहे. शिवरायांच्या विचारावर आधारित समाज घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आवर्जून आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुनगंटीवार यांनी संस्था चालकांशी संवाद साधला आणि विविध संस्थांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. कदम यानीही यावेळी विचार व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा