गृहनिर्माण संस्था मतदार नोंदणी अभियानांतर्गत ३३ हजार अर्ज प्राप्त
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि.४: जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे आयोजित ‘गृहनिर्माण संस्था मतदार नोंदणी अभियाना’अंतर्गत जिल्ह्यात २० हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. इतर १३ हजार मतदारांकडून नाव वगळणे, तपशीलात दुरुस्ती, मतदार केंद्रातील बदलासाठी अर्ज भरून घेण्यात आले.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत हिंजवडी येथे २२ जुलै रोजी या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. २२, २३, २९ आणि ३० जुलै रोजी जिल्ह्यातील एकूण १ हजार १३८ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण संस्थांना भेट देऊन मतदार नोंदणी केली व नोंदणी प्रक्रियेची माहिती नागरिकांना दिली.
जिल्ह्यातील २१ विधासभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १३ हजार ५२६ आणि दुसऱ्या टप्प्यात ६ हजार ७६३ असे एकूण २० हजार २८९ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक १ हजार ४९६ मतदारांची नोंदणी करण्यात आली. २ हजार ५२३ मतदारांनी नाव वगळण्यासाठीचा नमुना ७ चा अर्ज, ९ हजार ९१५ मतदारांनी पत्ता बदलासाठी नमुना ८ आणि ८८२ मतदारांनी आधार जोडणीसाठी नमुना ६ बी चा अर्ज भरून सादर केला. २२ व २३ जुलै रोजी २२ हजार ४०६ आणि २९ व ३० जुलै रोजी ११ हजार २०३ अर्ज भरून घेण्यात आले.
नागरिकांनी २१ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा. मतदार नोंदणी, मतदार यादी तपशीलातील बदल आदी विविध बाबींसाठी नमुना अर्ज भरून द्यावेत. गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा