मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते वन देवी उद्यान कोथरुड येथे वृक्षारोपण ; युवकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी करावी-श्रीकांत देशपांडे

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 



पुणे, दि. १४: युवकांनी वृक्षारोपण करून वनसंपदा जतन करण्यासोबतच लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणीत सहभाग घ्यावा,  असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. 


जिल्हाधिकारी कार्यालय, वर्शिप अर्थ फाऊंडेशन, विल्लो पूनावाला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व ममोज पांडा यांच्या सहकार्याने वन देवी उद्यान कोथरूड येथे आयोजित वृक्षारोपण मोहिमेत श्री. देशपांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, २१० कोथरूड विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी अंजली कुलकर्णी, वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे तेजस गुजराथी, अल्ताफ पिरजादे, ममोज पांडाचे संचालक यश पावले, निवडणूक साक्षरता क्लब पुणे विभागाचे समन्वयक सूरज शिराळे, नेहा गवळी, आशिष जगनाडे, राज चव्हाण आदी उपस्थित होते. 


श्री. देशपांडे म्हणाले, भारत हा युवकांचा देश आहे. देशाचे भवितव्य हे युवांच्या हाती आहे. पुण्यात युवा मतदारांची संख्या कमी आहे. युवा पिढीने वृक्षारोपण, नदी सवर्धन यासारख्या विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासोबत नव मतदार बनून सामाजिक बांधिलकी जपावी. पुण्याला भरपूर टेकड्यांच्या वारसा लाभलेला आहे. तो वारसा आपण वृक्षारोपण करुन जपला पाहिजे. 


मतदारांमुळे आज भारतीय लोकशाही जिवंत आहे. पुणे विभागातील निवडणूक साक्षरता क्लबची संकल्पना मतदानापुरती मर्यादित नसून ती लोकशाही मुल्यांच्या दिशेने वाढली आहे. त्या लोकशाही मुल्यांअंतर्गत अनेक सामाजिक विषय आहेत. ज्यामध्ये वृक्षारोपण आणि पर्यावरण असे  महत्वाचे विषय आहेत. लोकशाहीमध्ये खुप आव्हाने आहेत. जोपर्यंत मतदार आपले अधिकार बजावतात तोपर्यंत लोकशाहीला धोका नाही. आजच्या युवांमध्ये सर्जनशीलता खूप असून  त्याचा त्यांनी वापर करावा, 'माझे झाड माझी जबाबदारी' ही संकल्पना पूर्णत्वास आणावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


श्रीमती कळसकर यांनी वृक्षारोपणामागचा हेतू सांगितला. त्या म्हणाल्या, पुणे जिल्ह्यात ४ लोकसभा आणि २१  विधानसभा मतदार संघ आहेत. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त ८०  लाख मतदार आहेत. त्यामध्ये युवा मतदारांचे प्रमाण खुपच कमी आहे. वृक्षारोपणासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी  अधिकाधिक संख्येने मतदार नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 


यावेळी  पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघाच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले. हे वृक्ष संगोपनाची जबाबदारी रोटरी आणि लायन्स क्लब यांनी घेतली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


कार्यक्रमाच्या ठिकाणी २१० कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्यावतीने मतदार प्रक्रियेसंबंधी नमुना अर्ज क्रमांक ६, ७, आणि ८ भरुन घेण्यात आले. या विशेष अभियानाची पाहणी श्री.देशपांडे यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात