जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार ; राजकीय क्षेत्रातून महाजनी यांना श्रद्धांजली
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे दि.१५, मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विद्युत दाहीनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.रवींद्र महाजनी यांच्या मागे पत्नी माधवी महाजनी,मुलगा अभिनेता गश्मीर, मुलगी आणि नातवंड असा परिवार आहे.
दरम्यान राजकीय क्षेत्रातूनही रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील –
मराठी चित्रपट सृष्टीतील राजबिंडा व्यक्तीमत्त्व अशी ओळख असलेल्या रविंद्र महाजनी यांचे जाणे सर्वांनाच चटका लावणारे आहे. ‘देवता’ या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘खेळ कुणाला दैवाचा कळला?’ या ओळींची आज प्रत्यक्षात अनुभूती होत आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे –
‘रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून महाजनी यांनी चित्रपटात केलेली आपली कारकीर्द मराठी रसिकांच्या निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्या निधनाने एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली’,असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –रवींद्र महाजनी यांचे झुंज, मुंबईचा फौजदार, लक्ष्मीची पाऊले यांसारख्या चित्रपटात केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांना आणि त्यांच्या अभिनयाला देखणा हे विशेषण शोभून दिसायचे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर कुटुंबियांना देवो, हीच प्रार्थना.
उपमुख्यमंत्री अजित पवार –
देखणे व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशके अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रवींद्र महाजनी यांच्या अभिनयाने मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने एक देखणा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचे निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार-
रवींद्र महाजनी हे त्यांच्या देखण्या आणि भारदस्त व्यक्तीमत्वामुळे 1980 च्या दशकात ‘चॉकलेट हिरो’ म्हणून प्रसिद्ध होते. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, दुनिया करी सलाम अशा चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. त्यांची देऊळबंद चित्रपटातील संत श्री गजानन महाराज यांची भूमिका छोटी पण लक्षात राहणारी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा