लेख : आंतरराष्ट्रीय योगदिन आणि आपण

जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

हिंदुस्थानचा इतिहास पाहता वेद उपनिषदांच्या काळापासू न म्हणजेच सुमारे ५००० वर्षांपासून हिंदुस्थानास ऋषीमुनींची परंपरा लाभलेली आहे आणि त्या काळातील अनेक ऋषीमुनींनी योगाभ्यास व योग साधनेद्वारे कठोर तपश्चर्या करून बौद्धिक व आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती करून या साधनेतून मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो आणि मनाची एकाग्रता व आत्मविश्वास प्राप्त करता येऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले आहे आणि इतिहास त्याचा साक्षी आहे.

         पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वतः योगविद्येचे उपासक आणि प्रसारक असल्याने आणि योगसाधनेद्वारे मन,मेंदू आणि मनगट यांचा विकास होऊन प्रवृत्ती व प्रकृती यांत सकारात्मक बदल होऊन मानसिक स्वास्थ्य लाभून विश्व आरोग्यसंपन्न, सकारात्मक, आशावादी व शांतताप्रिय व्हावे या उदात्त हेतूने सन २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघात २१ जून हा *जागतिक योगदिन* म्हणून साजरा करण्याचा ठराव मांडला आणि तो १७७ राष्ट्रांच्या पाठिंब्याने संमत झाला.आश्चर्य म्हणजे या आठ नऊ वर्षाच्या कालखंडात १९३ देशात हा दिवस साजरा होऊ लागला असून जगभरातील सुमारे २५० कोटी लोकांनी या योगाभ्यासाचा लाभ घेऊन आपले जीवन निरोगी व आनंददायी बनविले आहे.

            योगा म्हणजे व्यायाम,शरीर वाकवणे,ताणणे,श्वासोच्छ्वास एवढाच संकुचित अर्थ बऱ्याच लोकांकडून घेतला जातो आणि  योगायोग या शब्दाप्रमाणे फ़क्त २१ जूनचा योग साधून योगा करणे असा नव्हे तर योगा हा शरीर, मन,आत्मा यांच्याशी खूप निगडित आहे.दुसरे म्हणजे योग हे केवळ ज्ञान नसून ते एक परिपूर्ण विज्ञान आहे.तो केवळ व्यायाम किंवा आसन अथवा कसरत नसून भावनात्मक समतोल व आध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे आणि ह्याचा खरा प्रसार या शास्त्राचे जनक महर्षी पतंजली यांच्यापासून सुरू झाला असे म्हटले जाते.

           वर उल्लेखिलेल्याप्रमाणे आपल्यापैकी बहुतांश जणांना योग म्हणजे नेमके काय? याबाबत पूर्णतः माहिती नाही त्यामुळे योगाचा संकुचित असा अर्थ त्यांच्याकडून समजून घेतला जातो.खरंतर योगा म्हणजे शरीर, मन व आत्म्याला एकत्रित करून जगणे होय.योगा म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम नसून तो एक मानसिक आणि आत्मिक व्यायाम आहे ज्यायोगे मनःशांती व आत्मिक शक्ती वाढण्यास मदत होते.अलीकडच्या काळात लोक जाणीवपूर्वक योगाभ्यासकडे वळल्याने योग म्हणजे काय? आणि मानवास त्याची आवश्यकता का आहे? हे समजू लागल्याने त्यांनी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये योगाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे आणि त्याद्वारे त्यांनी योग हा शारीरिक, मानसिक, भावनिक, आत्मिक आणि आध्यात्मिक बाबींवर कार्य करते.

                      लोकांनी अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आलेल्या अनुभवांवर योगाचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.मुळात 'योग'हा शब्द आलाच कोठून? याचा मागोवा घेतला असता हा संस्कृतमधील 'युज'या शब्दापासून आला असून त्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्रित होणे असा आहे.म्हणजेच शरीर, मन,आत्मा आणि अध्यात्म यांना एकत्रित जोडून मानवी जीवनाचे कल्याण करणे होय.

         आज आपण २१व्या शतकाच्या उंबरठ्यावरून खूप पुढे गेलो आहोत आणि आपण विज्ञान, तंत्रज्ञान, अन्नधान्य इत्यादी मध्ये खूप प्रगती केली आहे व त्यातून मिळणाऱ्या सुखसोयींमुळे आपले आपल्या प्राचीन गोष्टींकडे दुर्लक्ष व्हायला लागले आहे किंबहुना यात सुखसोयीप्राप्तीमध्ये आपण एवढे गुरफटलेले आहोत की आपली शारीरिक थकावट ,मानसिक ताणतणाव वाढलेले दिसून येत आहेत.आपल्या प्रकृतीकडे व प्रवृत्तीकडे आणि आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. खरंतर मानव हा गरजेच्या आदेशानुसार वागणारा २१ व्या शतकातील रोबोट झाला आहे असे म्हटले तरी अतिशोक्ती ठरणार नाही.

                या माहिती तंत्रज्ञानाच्या गतिमान युगात आपण प्रदूषण, भेसळयुक्त कमी पोषकमूल्ये असणारेआणि रासायनिक प्रक्रियेने पिकवले जाणारे अन्नधान्य, बेकरी उत्पादने ,दूध, इत्यादीच्या सेवनाने शरीरावर आणि पर्यायाने मनावर त्यायोगे आत्मिक शांततेवर परिणाम होऊन वेगवेगळ्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे आणि त्या व्याधींना नियंत्रणात ठेवण्यासाठी परत रासायनिक औषधांचे सेवन करावे लागत आहे आणि त्या मार्फत एक व्याधी बरी होताना ती औषधे आपल्या शरीरात दुसऱ्या व्याधींना जन्म देऊन जात आहेत आणि या चक्रात एकदा का माणूस अडकला की त्यातून सहजासहजी सुटका होणे शक्य नाही. यासाठी मानवाला या चक्रातून सुटका करून घ्यायची असेल अथवा या चक्रात अडकायचेच नसेल तर योगाभ्यासाशिवाय दुसरा रामबाण उपाय नाही.

          आपण जर आजूबाजूचे बारकाईने निरीक्षण केले तर असे लक्षात येईल की आपल्या व्याधींवर उपचार करणारे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे बहुतांशी डॉक्टर लोक आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करतात यावरून आपणास योगाभ्यासाचे महत्व लक्षात यायलाच हवे. अलीकडे शासनाच्या शिक्षण विभागाने व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्येही शारीरिक शिक्षणात योगाभ्यासालाही अनन्यसाधारण महत्व दिले आहे जेणेकरून बालवयापासून त्यांच्यावर योगाचे संस्कार व्हावेत व रोगापासून त्यायोगे होणाऱ्या त्रासाच्या भोगापासून येणारी पिढी दूर राहून शरीर, मन, आत्मा यांचा विकास करून घेऊन बल शाली भारत घडवण्यास तयार होऊन आत्मिक व अध्यात्मिक प्रगती करून विश्वशांतीचे उपासक व्हावेत हा उद्देश आहे.     

              आपण सर्वांनी योग दिनाचे  औचित्य साधून योगाभ्यासाच्या तयारीला लागून बलशाली भारत घडवूया.

         

सौ.अनिता गोरखनाथ गोरे उपशिक्षक, शाळा अभेपुरी

ता.वाई जि.सातारा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात