१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिकांना भरती होण्याचे आवाहन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. २८ : मराठवाडा इको बटालियन अंतर्गत येत असलेल्या १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांची एकूण २४९ पदे भरावयाची असून संबंधितांनी भरती रॅलीत भाग घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे (नि.) यांनी केले आहे.
१०१ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री, जनरल परेड ग्राउंडच्या मुख्य गेटजवळ, अर्जुन मार्ग पुणे येथे २४ जुलै ते २७ जुलै व मुख्यालय ९७ आर्टी ब्रिगेड, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मिलिटरी कँट, (सर्वत्र स्टेडियम) येथे ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत भरती प्रक्रियेचे आयोजित करण्यात येणार आहे.
१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार या बटालियन मध्ये ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरची ६ , सोल्जर जीडी (सामान्य कर्तव्य), लिपिक जीडी (सामान्य कर्तव्य) ६, शेफ समुदाय ५, वॉशरमन २, ड्रेसर ३, घरकाम पाहणारी व्यक्ती ३, लोहार १, मेस किपर १, कारागीर (लाकूड - कामगार ) १, मेस शेफ १ अशी एकूण २४९ पदे रॅलीच्या माध्यमातून भरावयाची आहेत. १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार या बटालियनमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना वृक्षारोपण उपक्रमात मराठवाडा विभागात तसेच पूर्ण देशात कर्तव्य बजावावे लागेल.
पात्रता/सेवेची अट पुढीलप्रमाणे: माजी सैनिक पेन्शन धारक असावेत. पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचारी (अकाली सेवानिवृत्तांसह) यांची किमान 20 वर्षाची सेवा गृहित धरली जाईल. माजी सैनिकांचा सेवानिवृत्ती झाल्याचा कालावधी हा ५ वर्षांपेक्षा जास्त नसावा. उमेदवारांची वैद्यकीय श्रेणी 1 मधील असावी. सेवानिवृत्तीच्या वेळी माजी सैनिकांचे चारित्र्य प्रशंसनीय आणि खूप चांगले असावे. पोलिस प्रकरणामध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा. माजी सैनिक (इतर पदे) वयाच्या 50 वर्षापर्यंत तर माजी सैनिक (जेसीओ) वयाच्या ५५ वर्षापर्यत भरतीस पात्र ठरतील. भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि उपदान मिळणार नाही. निवडलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागेल.
भरती मेळाव्यादरम्यान उमेदवारांना झालेल्या कोणत्याही अपघातास, दुखापतीस भरती करणारे प्राधिकारी जबाबदार राहणार नाही. उमेदवारांची निवड ही पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. सामान्य कर्तव्य (जनरल ड्यूटी) पदांसाठी माजी सैनिक हे फक्त महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. ट्रेड्समेन या पदासाठी राज्याचे अधिवास लागू नसून पूर्ण भारतातील उमेदवार पात्र असतील.
भरती झालेले कर्मचारी हे नोकरी करण्यास कोणत्याही कारणान्वये असमर्थ ठरल्यास कमांडर टेरिटोरियल आर्मी ग्रुप मुख्यालय दक्षिणी कमांडच्या मान्यतेनुसार युनिट बोर्ड ऑफ ऑफिसर्सद्वारे त्यांना सेवेतून काढण्यास जबाबदार राहतील. भरती झालेले माजी सैनिक (इतर पदे) ची नियुक्ती फक्त शिपाई पदावर तर माजी सैनिक (जेसीओ) ची नियुक्ती नायब सुबेदार च्या पदावर केली जाईल. पूर्व सेवेतील पद विचारात घेतले जाणार नाही. कर्मचाऱ्यांना वार्षिक रजा ३० दिवस आणि प्रासंगिक रजा १५ दिवस अनुज्ञेय राहिल.
माजी सैनिकांचे डिस्चार्ज बुक, सैनिक ओळखपत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ). शिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व आधार कार्डची छायांकित प्रत आदी आणणे आवश्यक राहील.
इच्छुक उमेदवारांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९१६८१६८१३६ आणि दुरध्वनी क्रमांक ०२०-०२३०१९५ किंवा ईमेल पत्ता ecoterriersone36@gmail.com वर संपर्क साधून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा