उद्योगमंत्री उदय सामंत यांची हातकागद संस्था संशोधन, प्रशिक्षण विभागास भेट; संस्थेच्या गुणवत्ता व उपयुक्तता सुधारण्यासाठी शासन कटीबद्ध-उद्योगमंत्री
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे, दि. २२: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उपयुक्तता वाढविण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावा, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळांतर्गत हातकागद संस्था संशोधन, प्रशिक्षण विभागाला भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी एन. जी. पाटील, सहसंचालक उद्योग सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक पी. जी. रेंदाळकर, संचालक हातकागद तथा जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात, उद्योजक मंगेश लोहपात्रे आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, खादी व ग्रामोद्योग मंडळाची हातकागद ही महाराष्ट्रातील एकमेव जूनी संस्था आहे. या संस्थेची वार्षिक उलाढाल त्यातुलनेत आहे. या ठिकाणी उत्पादीत होणाऱ्या उत्पादनास चांगली बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. या ठिकाणी टाकाऊ कागद, जलपर्णी, जुनी कपडे यावर प्रक्रिया करुन फाईल, फोल्डर, कागद आणि इतर स्टेशनरी वस्तू बनविल्या जातात, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
संस्थेत तयार होणाऱ्या वस्तुंचा औद्योगिक वसाहत व उद्योग विभागात पुरवठा करण्यासाठी सामंजस्य करार तयार करावा. संस्थेचा विकास, गुणवत्तावाढ करण्यासाठी आवश्यक निधीसाठीही प्रस्ताव सादर करावा. मंत्रालय स्तरावर बैठक घेवून संस्थेचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
रत्नागिरी औद्योगिक वसाहतील अशा प्रकारचे हातकागद बनवणारी संस्था स्थापन करण्यासाठी 15 गुंठे जागा उपलब्ध करुन दिली जाईल. त्यामुळे स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पाटील आणि सुरवसे यांनी हातकागद संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा