मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद;जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 


  मुंबई, दि 15 :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ घोषित करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.

  सदस्य दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे स्मारक तसेच मालोजी राजेंच्या पादुकांसाठी दगडी मूळ स्वरुपाचा चबुतरा उभारण्यात यावे, याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी पर्यटनमंत्री श्री. लोढा बोलत होते.  

  मंत्री श्री. लोढा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी वास्तव्य केलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील भुईकोट किल्ला महसूल विभागाकडे आहे. महसूल विभागाच्या नोदींत मालोजीराजांच्या इतिहासाच्या बाबींचा उल्लेख आहे. इतिहासाची साक्ष असणाऱ्या या ऐतिहासिक जुनी तहसील कचेरी म्हणजेच मालोजीराजे यांच्या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुज, गाव, वेस  यांचे पुनरुज्जीवन करुन या कचेरीच्या जागेतच मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्यात येईल. मालोजीराजेंच्या पादुकांसाठीही दगडी मूळ स्वरुपाचा चबुतरा उभारुन त्यांचे जीवन चरित्र महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्न करेल.

  मालोजीराजे भोसले यांच्या गढी संवर्धनासाठी पर्यटन विभागामार्फत 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. तसेच येत्या 2 महिन्यांच्या आत ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येईल. या ठिकाणची, वास्तूची देखभाल ज्या विभागाकडे असेल त्यांच्या समन्वयाने तेथील अतिक्रमणे काढण्यात येतील. यासाठी लवकरच पर्यटन, सांस्कृतिक कार्य, महसूल आणि गृह विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात