आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा

 जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे,दि.२३:- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी  २६ फेब्रुवारी  रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा कालावधी  २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. या कालावधीनंतर प्रचाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना  तसेच राजकीय पक्षांवर कडक कारवाई केली जाईल, असे निवडणुक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी कळविले आहे.   


मतदान बंद होण्याच्या ४८ तास अगोदर सुरु असलेला प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर, मतदारसंघाबाहेरून आलेले आणि त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते इत्यादींनी त्या मतदार संघात उपस्थित राहू नये. अशा नेत्यांनी प्रचाराचा कालावधी समाप्त होताच तो मतदार संघ सोडावा. उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना ही बाब लागू होणार नाही. केवळ निवडणुकीच्या कालावधीत राज्याचा प्रभारी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत अशा निर्बंधाचा आग्रह धरला जात नाही. असा पदाधिकारी राज्य मुख्यालयातील आपले राहण्याचे ठिकाण घोषित करील आणि प्रस्तुत कालावधीतील त्याची ये-जा ही सामान्यपणे त्याचे पक्ष कार्यालय आणि त्याचे राहण्याचे ठिकाण यापुरतीच मर्यादित राहील. 


उमेदवारास उद्या सायंकाळनंतर ४८ तासाच्या कालावधीत कोणत्याही जाहीर सभा आणि मिरवणुका आयोजित करता येणार नाही. तसेच मतदान संपेपर्यंत प्रसारमाध्यमांना जनमत चाचणी प्रसारित करण्यास प्रतिबंध असेल.  कोणत्याही जाहिराती किंवा प्रायोजित कार्यक्रम किंवा एखाद्या इराद्याने उमेदवाराला पाठिंबा देणारे किंवा टीका करणारे कोणतेही अहवाल निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणारे किंवा प्रभावित करणारे कोणतेही अहवाल प्रतिबंधित असतील, निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या सूचनांप्रमाणे  नियमांची अंमलबजावणी करण्यास निवडणूक विभाग कटिबद्ध आहे, असे श्री. ढोले यांनी सांगितले. 


प्रचारासाठी लावण्यात आलेले फ्लेक्स, झेंडे, जाहिराती संबंधित उमेदवाराने काढून घ्यावे, तसेच कोणत्याही प्रकारे वाहनांद्वारे प्रचार करण्यास प्रतिबंध असेल, याबाबत पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना आचारसंहिता कक्षाला देण्यात आल्या आहेत.

मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश श्री. ढोले यांनी दिले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोलापूर जिल्यातील बाबुळगाव जातीयवाद्यांचा बौद्ध समाजाच्या कार्यकार्त्यावर हल्ला

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उपाध्यक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका युवक अध्यक्षांचा पाठिंबा

वाल्हेकरवाडी येथे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित श्रीराम प्रतिमा पुजन व दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात