मावळ येथे आपत्ती मित्र प्रशिक्षणाचे आयोजन
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
पुणे दि.24: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ येथे आपत्ती मित्र प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला असून मावळ आणि मुळशी तालुक्यातील शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक, गिरी प्रेमी संस्था या आपत्कालीन संस्थेचे स्वयंसेवक आणि सर्पमित्र असे एकूण 87 तरुण ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
बारा दिवसाच्या या प्रशिक्षणात आपत्ती व आपत्ती चे प्रकार, आणीबाणी, प्रथमोपचार, धोके ओळखणे, आपत्कालीन चक्र, भूकंप, पूर, चक्रीवादळ, वीज पडणे, कृत्रिम श्वासोच्छवास, आग व आगीचे प्रकार, व्हर्टीकल रेस्क्यू इत्यादी गोष्टींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास हे प्रशिक्षणार्थी तेथे जावून मदत कार्य करून जिवीत हानी टाळू शकतात.
मानवी कुबडी, पाठीवर सरळ घेणे, अग्निशमन दल कर्मचारी उचल, अग्निशमन दल रांगणे, जिन्यावरून खाली आणणे, दोन, तीन, चार हातांची बैठक, विविध आपत्कालीन स्ट्रेचर इत्यादी गोष्टीचे प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, राहुल पोखरकर, सायली चव्हाण आणि ओंकार पोखरकर यांनी प्रशिक्षणाचे नियोजन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा