लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करावे - संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. 22 :- लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करुन मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी यासारख्या मुलभूत नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘लोकप्रतिनिधींची स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्ये आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.
संसदीय कार्य मंत्री श्री.पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातील कामांबाबत दूरदृष्टी असली पाहिजे. मतदार संघातील नागरिकांच्या मुलभूत नागरी सुविधांसाठी अर्थसंकल्पातील निधी मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. मतदार संघातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेऊन निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरून त्यांच्यासाठी नियोजनबद्ध वेळ दिला पाहिजे, त्यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे. निवडणूकीची समिकरणे आता बदलली आहेत. विकासकामांबरोबरच जनतेशी सतत जनसंपर्क ठेवणे महत्त्वाचे झाले आहे. लोकप्रतिनिधींनी कर्तव्य, जबाबदाऱ्या व विकासकामांचे नियोजन यांचा समन्वय ठेवला पाहिजे. एका बाजूला विकासकामे, दुसऱ्या बाजूला संपर्क आणि तिसऱ्या बाजूला व्यक्तिगत वागणे यांचा समन्वय असेल तर मतदारसंघही सुरक्षित राहतो.
मतदार संघातील प्रत्येक विकासकाम करीत असतांना लोकप्रतिनिधींनी कुटुंबप्रमुख म्हणून नागरिकांना प्रत्येक कामात सहभागी करुन घेतले पाहिजे. मतदार संघातील सार्वजनिक कामांबरोबरच नागरिकांच्या वैयक्तिक कामांकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. सगळीकडे शहरीकरणाचे प्रमाण वाढत चालले आहे. नागरिकांना नागरी सुविधा देताना भविष्यातील समस्यांचा विचार करून विकासकामे करताना योग्य ते नियोजन करावे. विशेषत: आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिलांसाठी नागरी सुविधा यासाठी प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचे, श्री.पाटील यांनी सांगितले.
‘राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन’ हा विषय विकासासाठी फार महत्त्वाचा आहे. लोकशाहीमध्ये सगळे निर्णय राज्यकर्तेच घेत असतात. चांगले राज्यकर्ते तयार होण्यासाठीही युवकांनी राजकारणात व चळवळीत सक्रिय होणे आवश्यक असल्याचे मत श्री.पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अवर सचिव सुनिल झोरे यांनी श्री.पाटील यांचा परिचय करुन दिला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री.पाटील यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थींनी कु.प्रियांका मोहिते यांनी आभार व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा